नागपूर, ता. २०: नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचा कणा असलेल्या १०९९ आशा स्वयंसेविकांना राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (ता.१९) दिवाळी भेट म्हणून सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सायकलमुळे कामात गती येईल आणि सेवा करण्याची ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
रविवारी (ता.१९) शहरातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री बोलत होते. मंचावर राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण – दुग्ध्व्याव्साय – अपारंपरिक उर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री श्री. अतुल सावे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्री. श्याम कुमार बर्वे, आमदार डॉ. परिणय फुले, आमदार श्री.आशिष देशमुख, आमदार श्री. कृपाल तुमाने, आमदार श्री. चरणसिंग ठाकूर, आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री. संजय मेश्राम, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री. शेरसिंग डागोर यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., सामाजिक न्याय विभागाच्या श्रीमती सुकेशनी तेलगोटे,मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष आंबुलकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सायकलमुळे आशा स्वयंसेविकांना त्यांचे दैनंदिन आरोग्यविषयक कार्य अधिक जलद आणि प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. वेळेची बचत, कामाची गुणवत्ता वाढणार आहे. आशा स्वयंसेविकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात दररोज अनेक महत्त्वाची कामे करावी लागतात. यामध्ये घरोघरी जाऊन माहिती संकलित करणे, वस्ती रजिस्टर, जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे, गर्भवती महिलांची यादी तयार करणे, लसीकरणास पात्र बालकांची माहिती घेणे तसेच नागरी पोषण दिवस (Urban Nutrition Day) आयोजित करणे यांचा समावेश असतो. ही कामे करताना प्रवासामध्ये बराच वेळ जातो. ही समस्या लक्षात घेऊन सायकलची मागणी करण्यात आली होती, ज्यामुळे त्यांचा जाण्या-येण्याचा वेळ वाचेल आणि कामाच्या वेळेचा प्रभावी वापर होईल.
या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना – जिल्हा खनिज प्रतिष्ठान (PMKKKY-DMF), नागपूर अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर अनुदानाच्या अनुषंगाने सायकल खरेदीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून नागपूर शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत १०९९ आशा स्वयंसेविकांना सायकल पुरवण्यासाठी कार्यादेश देण्यात आले आहे. यामुळे आता लवकरच आशा स्वयंसेविका आपल्या कामाच्या क्षेत्रात अधिक उत्साहाने आणि गतीने आरोग्य सेवा देऊ शकतील. रविवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरूपात १० आशा स्वयंसेविकांना सायकल वाटप करण्यात आल्या. तसेच उर्वरित आशा स्वयंसेविकांना त्या कार्यरत असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते सोमवार (ता. २०) पासून सायकल वाटप करण्यात येत आहे. अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.