Published On : Tue, Apr 27th, 2021

दिव्‍यांग बांधवांना त्‍यांच्‍या हक्‍काचा 5 टक्‍के राखीव निधी त्‍वरीत देण्‍यात यावा

– नगरसेविका संध्या रायबोले यांचे निवेदन

कामठी -भारत सरकारच्‍या दिव्‍यांग व्‍यक्‍ती हक्‍क अधिनियम 2016 मधील कलम 37 ब मधील तरतुदींच्‍या अनुषंगाने नगरपालिका क्षेत्रातील दिव्‍यांग व्‍यक्‍तींना दारिद्रय निमुर्लन योजनेअंतर्गत 5 टक्‍के राखीव निधी तात्‍काळ देण्‍यात यावा अशी मागणी नगरसेविका संध्या रायबोले यांनी केली आहे.याबाबत चे निवेदन तहसीलदार अरविंद हिंगे यांना आज मंगळवारी दुपारी देण्यात आले निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सुनील हजारे,अरुण पौणिकर, विजय फुले,सुभाष राऊत,परमानंद मेश्राम,शौकत अली यांचा समावेश होता,

राज्‍यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव, वाढती रूग्‍णसंख्‍या व मृत्‍युदर लक्षात घेता पुन्‍हा एकदा कडक निर्बंध लागु करण्‍यात आले आहे. कोरोनाची एक लाट संपण्‍यापुर्वीच दुसरी लाट निर्माण झाली आहे. अनेकांचे रोजगार यामुळे हिरावले गेले आहेत.


अशा परिस्थितीत दिव्‍यांग व्‍यक्‍तींना आपल्‍या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अत्‍यंत कठीण झाले आहे. भारत सरकारच्‍या दिव्‍यांग व्‍यक्‍ती हक्‍क अधिनियम 2016 मधील कलम 37 ब मधील तरतुदींच्‍या अनुषंगाने नगरपालिका क्षेत्रातील दिव्‍यांग व्‍यक्‍तींना दारिद्रय निमुर्लन योजनेअंतर्गत दिव्‍यांग बांधवाना देय असलेला 5 टक्‍के राखीव निधी अदयाप दिव्‍यांग बांधवांच्‍या खात्‍यात जमा झाला नसल्‍याचे निदर्शनास आले आहे.

ही बाब अतिशय गंभीर आहे. कोरोना काळात प्रतिकुल आर्थीक परिस्थितीचा सामना करणा-या दिव्‍यांग बांधवांना त्‍यांचा हक्‍काचा हा राखीव निधी तातडीने मिळावा यादृष्‍टीने शासनस्‍तरावरून नगरपालिका मुख्याधिकाऱ्याना निर्देश देण्‍याची मागणी नगरसेविका संध्या रायबोले यांनी तालुका प्रशासनाकडे केली आहे.