Published On : Wed, May 2nd, 2018

गावाच्या श्रमदानातून उमठ्याला पाणीदार करण्याचा ग्रामस्थांचा संकल्प

Shramdan

नागपूर: पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नरखेड तालुक्यातील उमठा या गावातील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सुरु केलेल्या जलयुक्तच्या कामांना विभागीय आयुक्त अनूप कुमार तसेच जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ग्रामस्थांसोबत श्रमदान करुन या गावाला पाणीदार करण्याचा संकल्प केला. महाराष्ट्र दिनी जिल्ह्यात श्रमदानातून जलयुक्त अभियानाअंतर्गत विविध कामांना सुरुवात झाली. जिल्ह्यातील जनतेनेही उत्स्फूर्तपणे श्रमदानाला आपला सहभाग दिला.

गावातील प्रत्येक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाणी अडविण्यासोबतच जिरविण्यासाठी आपले योगदान दिल्यास गाव निश्चितच पाणीदार होईल. तसेच उमठा या गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पाणी वाचविण्याच्या ग्रामगीतेतील सुचनेनुसार गावकऱ्यांनी श्रमदान केल्यास आपले संपूर्ण गाव राज्यात आदर्श ठरेल आणि आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण होईल. असा विश्वास ग्रामस्थांना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिला. तसेच स्वत: श्रमदान करुन ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणीत केला.


पाणी फॉऊंडेशनमध्ये नरखेड तालुक्यातील विविध गावांनी सहभाग घेऊन आपले गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला. त्याअनुषंगाने महाराष्ट्र दिनी उमठा या गावात महाश्रमदानाला सुरुवात झाली. गावातील शेतकऱ्यांनी पाण्याचे महत्व ओळखून पाणी अडविण्यासाठी श्रमदानाच्या माध्यमातून विविध कामांना सुरुवात केली आहे. गावामध्ये पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून जिरवण्याचे नियोजन करण्यासोबतच शाश्वत सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी सलग समतलचर, दगडीबांध, शेततळे आदी कामे करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.

उमठा गावशिवारात ग्रामस्थांसोबत विभागीय आयुक्त अनूप कुमार तसेच जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी श्रमदान करुन ग्रामस्थांचा उत्साह वाढविला. ग्रामस्थांनीही श्रमदानातून आतापर्यंत 400 मिटरचे सलग समतलचर, 800 मिटरचे कंपारमेंट बंडींग, 80 दगडीबांध, 5 शेततळे आदी कामे केली आहेत. या उपक्रमात विविध विभागांनीही सहभागी होऊन विशेषत: कृषी विभागाने दोन सिमेंट नालाबांध, चार नाल्यांचे खोलीकरण तसेच तीन जुन्या बांधाची दुरुस्ती आदी कामे सुरु केली आहे. लघुसिंचन विभागामार्फत कोल्हापुरी बंधाऱ्याचे दुरुस्ती व खोलीकरण तसेच पाझर तलावाचे गाळ काढण्याचे काम करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपविभागीय महसूल अधिकारी श्रीमती भोसले तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी श्रमदानात आपला सहभाग दिला.