Published On : Thu, Jul 16th, 2020

प्रभाग ३ व ४ ची पाण्याची समस्या लवकरच सुटणार : झलके

पाहणी दौ-यामध्ये पाण्याची टाकी हस्तांतरीत करण्याचे निर्देश

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्री.विजय (पिंटू) झलके यांनी बुधवारी वांजरा पाण्याची टाकी मध्ये इन्लेटवॉलच्या कामाची पाहणी केली. नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून इन्लेटवॉल टाकण्यात आला आहे. यामुळे उत्तर नागपूर चे प्रभाग क्र ३ व ४ चे २५,००० नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे.

ऑरेंज सिटी वाटर कंपनी (ओसीडब्ल्यू) आणि मनपाच्या माध्यमातून नागपूरात १३०० एम.एम.क्यू पाइपलाईनच्या लीकेजस बंद करण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरु आहे. स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी त्यासाठी संयुक्त पाहणी दौरा केला. त्यांनी सेन्ट्रल एव्हेन्यूवरील डॉ.आंबेडकर चौक, पीली नदी आणि उप्पलवाडी मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण व्दारे केले जाणा-या गळती दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली.

या कामातून १.५ एम.एल.डी.पाण्याची बचत होईल. वांजरामध्ये पाण्याची टाकीचे निर्माण नागपूर सुधार प्रन्यास मार्फत करण्यात आले आहे. या टाकीचा या महिन्याच्या अखेर हस्तांतरण करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती यांनी दिले. या टांकीचे हस्तांतरण झाल्यानंतर प्रभाग ३ व ४ मधील पाण्याची समस्या सुटेल तसेच २५ टँकरच्या १५० ट्रीप कमी होतील. या पाहणी दौ-यामध्ये कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यू चे कुशल अतकरे, अनिकेत गडेकर, डेलीगेट पंचभाई आणि घरजाळे उपस्थित होते.