Published On : Tue, Jan 7th, 2020

जिल्हा परिषद निवडणूक; बावनकुळे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Advertisement

नागपूर: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सुरू झालेल्या मतदानात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

कोराडी ग्रामपंचायत येथे त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. ज्योतीताई बावनकुळे, मुलगा संकेत व कन्या पायल आष्टानकर होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात ही निवडणूक होत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपचा प्रभाव कमी करण्यासाठी तीन मंत्र्यांना हा भार सोपविला आहे. त्यामुळे ही निवडणूक नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या ५८ सर्कलसाठी २७० तर पंचायत समितीच्या ११६ गणासाठी ४९७ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षासह गोंडवाना गणतंत्र पाटील, प्रहार, बहुजन वंचित विकास आघाडी या पक्षाचेही उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे १३ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच २४७ झोन अधिकारी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय एकूणच निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे ८,५०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात १४,१९,७७० मतदार आहेत. यापैकी ७,३६,६४३ पुरुष व ६,८३,०५४ महिला मतदार आहेत. सोमवारी दुपारपर्यंत सर्व पोलीस पार्टी मतदान केंद्रावर रवाना झाल्या होत्या.