Published On : Fri, Sep 4th, 2020

पूरग्रस्त भागातील सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांचे निर्देश

– सावनेर, कळमेश्वर, कामठी, कन्हान, मौदा तालुक्यांना भेटी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा आज जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केला. त्यांनी आज सावनेर, कळमेश्वर, कामठी, कन्हान, मौदा या तालुक्यांना भेटी देऊन अनेक गावातील पूर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महसूल यंत्रणेला तातडीने सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Advertisement

राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्यापाठोपाठ आज जिल्हाधिकारी ठाकरे यांनी देखील पूरग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट दिली. नागपूर सोबतच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या संदर्भातील प्राथमिक नुकसानाची आकडेवारी पुढे आली असली तरी प्रत्यक्ष नुकसान हे महसूल विभागाच्या सर्वेक्षणानंतर ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला गती देण्यासाठी व सर्वेक्षणाच्या संदर्भातील कार्यवाहीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्यांनी ही भेट दिली आहे.

Advertisement

पूर ओसरून गेल्या नंतरच्या परिस्थितीत करावयाच्या कामकाजाचा त्यांनी यावेळी प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. सर्वात आधी शुद्ध पिण्याचे पाणी व आरोग्य व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.

सर्वेक्षण सुरू असतानाच या कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही त्यांनी यावेळी यंत्रणेला बजावले. काही गावांमध्ये वाहून गेलेल्या रस्त्याची देखील त्यांनी पाहणी केली. तर गावांमध्ये ज्या ठिकाणी पुराचे पाणी घुसले त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा केली.

पुरासोबतच त्यांनी कोरोना स्थितीचा देखील आढावा आज घेतला आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण सुरू असून यामध्ये किती नुकसान झाले हे सर्वेक्षणाच्या आकडेवारी नंतर स्पष्ट होणार आहे. आज जिल्हाधिकारी ठाकरे यांनी कन्हान तालुक्यातील सोनेगाव, मौदा तालुक्यातील शांतीनगर या गावांना भेट दिली. तर सावनेर, कळमेश्वर,कामठी, मौदा, येथील तहसील कार्यालयात व कन्हान नगर परिषद कार्यालयामध्ये आढावा घेतला.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement