Published On : Tue, May 15th, 2018

डेंग्यू दिवसानिमित्त १६ ला गप्पी मासे वितरण रॅली

नागपूर: राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये ‘गप्पीमासे वितरण रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गप्पी माशांचे नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे.

सदर रॅली कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये काढण्यात येणार आहे. प्रभातफेरीच्या माध्यमातून लोकांमध्ये हिवताप, डेंग्यू व इतर कीटकजन्य आजाराबाबत लोकांचा सहभाग घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. वर्दळीच्या ठिकाणी नि:शुल्क गप्पीमासे वाटप करण्यात येणार आहे.

सकाळी ८ वाजता प्रभातफेरी निघेल. लक्ष्मीनगर झोनमध्ये सोमलवाडा रुग्णालयातून, धरमपेठ झोनमध्ये रामदासपेठ येथून, हनुमान नगर झोनमध्ये झोन कार्यालयातून, धंतोली झोनमध्ये पार्वतीनगर येथून, नेहरूनगर झोनमध्ये नवीन नंदनवन पाण्याच्या टाकीजवळून, गांधीबाग झोनमध्ये मोमीनपुरा येथून, सतरंजीपुरा झोनमध्ये मेहंदीबाग येथून, लकडगंज झोनमध्ये वर्धमाननगर येथून, आशीनगर झोनमध्ये रिपब्लिकन नगर येथून तर मंगळवारी झोनमध्ये जरीपटका येथून प्रभातफेरी निघेल, अशी माहिती हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे यांनी दिली.