Published On : Wed, Sep 4th, 2019

घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा – आयुक्त

Advertisement


नागपूर : घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा, तलावात विसर्जित करू नये याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन नागपूर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.

गणेश विसर्जन व्यवस्थेसंदर्भातील पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहातील आयोजित बैठकीत घेतला.

यावेळी आयुक्तांसह महापौर नंदा जिचकार, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, मुख्य अभियंता मनोज तालेवार, झोन सहायक आयुक्त गणेश राठोड, प्रकाश वराडे, हरिश राऊत, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.सरिता कामदार, सहायक प्रमुख अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक, अविनाश बाराहाते, राजेश रहाटे, श्री.बोदिले, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी आयुक्तांनी आतापर्यंत विसर्जनस्थळावर मनपा प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. शहरात एकूण ३०० कृत्रिम तलाव ठिकठिकाणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांना गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा, असे आवाहन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. फुटाळा तलावावर आवश्यक तेवढे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात यावी. श्री गणेश विसर्जन दुसऱ्या दिवसापासूनच सुरू होते. त्यामुळे कृत्रिम तलावाची दररोजची संख्या किती याबाबतचा अहवाल मला सादर करण्याचे निर्देशही आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. विसर्जनस्थळी ठिकठिकाणी आवश्यक ते सूचना फलक लावण्याच्या सूचनाही आयुक्त अभिजीत बांगर यांनी केल्या. निर्माल्यासाठी ‘निर्माल्य कलश’ही ठिकठिकाणी ठेवावे, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

कृत्रिम तलाव स्वच्छ कराताना रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत करण्यात यावा. कृत्रिम तलाव स्वच्छ करताना पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, असेही आयुक्तांनी यावेळी निर्देशित केले.