नवी दिल्ली – संसद भवनात आज (५ ऑगस्ट) राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी करून स्वतःच अडचणीत आणलं आहे. त्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारला आहे. आता त्यांना या गोष्टीचं वैषम्य वाटतंय.” पुढे ते म्हणाले, “ही आमची ताकदीची जागा आहे आणि देव आमच्या सोबत आहे.”
अमित शाहांच्या कार्याची प्रशंसा-
या वेळी मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचंही कौतुक केलं. “लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर सर्वाधिक काळ गृहमंत्री म्हणून काम करणारे अमित शाह आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
दोन ठराव मंजूर, खासदारांना आवाहन-
या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘ऑपरेशन महादेव’वर आधारित दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि भारतीय लष्कराच्या कार्याचे या ठरावांतून कौतुक करण्यात आले.मोदींनी खासदारांना आपल्या मतदारसंघात तिरंगा यात्रा, क्रीडा दिन यांसारखे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले.या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर एनडीए नेते उपस्थित होते.