Published On : Fri, Jan 17th, 2020

खासगी ट्रॅव्हल्स संदर्भात समितीची ट्रॅव्हल्स असोसिएशनसोबत चर्चा

Advertisement

नागपूर: शहरातील खासगी ट्रॅव्हल्सची पार्कींग, रस्त्यावर तास न् तास उभ्या राहणा-या ट्रॅव्हल्स या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गुरूवारी (ता.९) ट्रॅव्हल्स असोसिएशनसोबत चर्चा करण्यात आली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित बैठकीत खासगी ट्रॅव्हल्ससंदर्भात महापौरांद्वारे गठीत समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके, सदस्य संदीप गवई, संजय बुर्रेवार, उपायुक्त राजेश मोहिते, मनपा वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता शकील नियाजी, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे यांच्यासह शहरातील ट्रॅव्हल्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासगी ट्रॅव्हल्सला शहराबाहेर थांबवायचे काय? कुठल्या कायद्यांतर्गत थांबवायचे? व पोलिसांची कशी मदत असावी या संदर्भातील संपूर्ण धोरण निश्चीत करण्याकरीता महापौरांच्या निर्देशान्वये ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली आहे.

शहरातील विविध भागातून खासगी ट्रॅव्हल्सची सेवा दिली जाते. मात्र या ट्रॅव्हल्सना पार्कींगसाठी जागा नसल्याने त्या रस्त्यावर पार्क केल्या जातात. तास न् तास रस्त्यावर उभ्या राहणा-या ट्रॅव्हल्समुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. शहरातील बैद्यनाथ चौक ते सरदार पटेल चौक, आग्याराम देवी चौक ते बस स्थानक चौक, बस स्थानक चौक ते डालडा कंपनी, गांधीसागर तलाव जवळील भागासह अनेक ठिकाणी ही समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे. ट्रॅव्हल्सच्या पार्कींगसाठी उपलब्ध जागेची माहिती दिल्यास मनपातर्फे तिथे व्यवस्था करण्याबाबत चर्चा केली जाईल, असे यावेळी समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी सांगितले.

यावेळी ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या पदाधिका-यांनीही काही सूचना मांडल्या. मनपातर्फे शहराच्या हद्दीतच खासगी ट्रॅव्हल्सना थांबण्याची व्यवस्था करण्यात यावी. कोणत्याही ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे रस्त्यावर गाड्या थांबविण्यात येणार नाही. वाहतुकीला अडचण होणार नाही याची पूरेपूर काळजी घेण्यात येईल, असे असोसिएशनतर्फे आश्वासित करण्यात आले. शहरामध्ये जी जागा ट्रॅव्हल्स पार्कींगसाठी प्रति तास दराने उपलब्ध होउ शकेल अशा जागांवर पार्कींगची व्यवस्था करून देण्यात आल्यास ट्रॅव्हल्स कंपन्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळेल, अशी सूचना असोसिएशनद्वारे मांडण्यात आली.

ट्रॅव्हल्सना थांबण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सर्वांकडून सूचना आमंत्रित आहेत. यासाठी लेखी स्वरूपात सूचना द्याव्यात. याशिवाय वाहतूक पोलिस उपायुक्तांशी बैठक घेउन यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. यासाठी असोसिएशनतर्फे ५ सदस्यांची नावे समितीला सादर करावी. समितीतर्फे सर्वांच्या सोयीचे निर्णय घेण्यात येईल. नागरिकांच्या सुविधा आणि ट्रॅव्हल्स मालकांचा होणारा नुकसान या सर्व बाबींचा अभ्यास करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी सांगितले.