Published On : Wed, Mar 21st, 2018

‘आपली बस’चा तोटा कमी करण्यासाठी परिवहन समितीच्या सभेत चर्चा

Advertisement


नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाद्वारे संचालित होणाऱ्या ‘आपली बस’चा तोटा वाढतच आहे. हा तोटा कमी व्हावा यासाठी विविध उपाययोजनांवर बुधवारी झालेल्या परिवहन समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली. समिती या विषयासंदर्भात गंभीर असल्याचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी सांगितले.

नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बुधवारी (ता. २१) परिवहन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. सभेला उपसभापती प्रवीण भिसीकर, सदस्य नितीश ग्वालबंशी, नितीन साठवणे, मनिषा धावडे, अर्चना पाठक, उज्ज्वला शर्मा, वैशाली रोहणकर, अभिरुची राजगिरे, कल्पना कुंभलकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, अरुण पिपुरडे आदी उपस्थित होते.

परिवहन विभागाचा तोटा कमी करण्यासाठी समितीतर्फे विशेष प्रयत्न सुरू असल्याचे परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी सांगितले. बैठकीत धोरणात्मक निर्णयासंदर्भातील विषय महासभेकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पानुसार नियमित बैठका होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. परिवहन विभागाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी राज्य शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रस्ताव बनविण्यासंदर्भातही सभापतींनी दिशानिर्देश दिले. परिवहन विभागाच्या ‘एस्क्रो’ खात्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली.

परिवहन विभागाद्वारे संचालित ग्रीन बस मध्ये विद्यार्थ्यांसाठी पास सुविधा सुरू करण्यासंदर्भातही चर्चा झाली. यासोबतच परिवहन विभागाशी संबंधित विविध आर्थिक विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.