Published On : Sat, Sep 23rd, 2017

इक्विसिटीतर्फे आपत्ती व्यस्थापन कार्यशाळा

नागपूर: युरोपियन युनिअनच्या सहयोगाने नागपूर महानगर पालिकेकरीता अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे संचालित इक्विसिटीतर्फे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन शनिवारी (दि.23) राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालय येथे करण्यात आले. कार्यशाळेचे उदघाटन उपायुक्त रवींद्र देवतळे यांच्या हस्ते झाले. प्रामुख्याने राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक जी. एस. सैनी, उपसंचालक राजेश चौधरी, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक उपस्थित होते.

कार्यशाळेतील “आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत” विविध आपत्ती परिस्थितीबद्दल माहिती घेऊन आपली जबाबदारी आणि कर्तव्य सहज पद्धतीने पूर्ण करण्याबद्दल माहिती देण्यात आली. यामध्ये नागपुरातील विविध याआपत्तीबद्दल अभ्यासपूर्ण सादरीकरण करण्यात आले. वातावरण आणि हवामानानुसार विविध आपत्ती अभ्यासिका सादर करण्यात आली. पहिल्या सत्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सौरभ कुमार यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर माहिती दिली. दुसऱ्यासत्रात आपत्ती तयारी या विषयावर डॉ. अरुणा गजभिये यांनी प्रकाश टाकला.

तिसऱ्या सत्रात राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालयाचे उपसंचालक आर. एस. चौधरी यांनी इमरजंसी रिस्पॉन्स विषयावर माहिती दिली. कार्यशाळेत राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालयाचे संचालक जी. एस. सैनी यांनी जबाबदारी आणि कार्यपद्धत या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक आणि संचालन जयंत पाठक यांनी केले. यावेळी अग्निशमन, आरोग्य, पाणी व्यवस्थापन व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांची उपस्थिती होती.