Published On : Fri, Oct 12th, 2018

शाळांमधून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात यावे : महापौर नंदा जिचकार

Advertisement

नागपूर : आज नैसर्गिक व मानवनिर्मित अनेक संकट आपल्यापुढे उभे आहेत. आज मोठ्या प्रमाणात मानवनिर्मित आपत्तींमध्ये वाढ झाली. या संकटांचा सामना करण्यासाठी तसेच यापासून स्वत:चे व आपल्या समाजातील लोकांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. लहान मुले सांगितलेली कोणतिही गोष्ट विसरत नाहीत. त्यामुळे मुलांना शाळेपासूनच आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात यावेत, ज्यामुळे ते पुढे समाजात त्याची उत्तम प्रकारे जनजागृती करतील, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर महानगरपालिका, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. १२) सिव्‍हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आपत्ती व धोके निवारण सप्ताहांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग, राष्ट्रीय नागरिक सुरक्षा महाविद्यालयाचे संचालक जी.एस. सैनी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खंजाजी, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन विभाग कोणत्याही आपत्तीसाठी सदैव तत्पर असते. ६ एप्रिलला नागपुरात आलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अशा स्थितीत अग्निशमन विभागाने चोख कामगिरी बजावत परिस्थिती योग्यरित्या नियंत्रणात आणली. शहरात उद्‌भवणाऱ्या आपत्तींसाठी अग्निशमन विभागासह नागरिकांनीही तत्पर राहण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. जनजागृतीशिवाय कोणतिही गोष्ट शक्य नाही, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

आपल्यावर येणारे संकट टाळण्यासाठी नेहमी प्रशासनीक मदत मिळणार आहेच. मात्र आपत्तीचे प्रसंग येण्याची वेळच येउ नये यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. मनपातर्फे कचरा उचलला जातो, रस्ते झाडले जातात. मात्र एवढे करूनही नागरिकांच्या घरात जर डेंग्यूची लारवी आढळत असेल, तर नागरिकांनी आपली जबाबदारीही पार पाडणे आवश्यक आहे. कोणत्याही आपत्तीमध्ये जिवीत व वित्त हानी होउ नये यासाठी अशा कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात यावी, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

आपत्ती व्यवस्थापनाबाबत जास्तीत जास्त जनजागृती व्‍हावी : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशान्वये संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्याप्रमाणे ९ ते १३ ऑक्टोबर हा आपत्ती व धोके निवारण आठवडा साजरा करण्यात येत आहे. शासनाने उचलेले हे महत्वाचे पाऊल असून याद्वारे आपत्तींचा कसा सामना करायचा याची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. या सप्ताहांतर्गत विविध शाळांमध्ये विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती करण्यात आली. आपल्यावर ओढवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी कोणती खबरदारी घेण्यात यावी, याची माहिती प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आवश्यकता आहे, असे मत प्रभारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केले.

स्वत:सह इतरांचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी : जी.एस. सैनी
अनपेक्षितपणे उद्‌भवणाऱ्या आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत होते. या आपत्तींचा सामना करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी साधन सामग्री नाही. आजघडीला २१ पैकी केवळ आठ अग्निशमन केंद्र आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेता ही संख्या कमीच आहे. अशा स्थितीत उद्भवणा-या आपत्तीमधून स्वत:सह इतरांचे रक्षण करणे ही प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून काम करावे, असे मत राष्ट्रीय नागरीक सुरक्षा महाविद्यालयाचे संचालक जी.एस. सैनी यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमात श्री. सैनी यांनी आपत्ती व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, इतरांचे रक्षण करण्यापुर्वी वाचवणारा वाचला पाहिजे हे धोरण लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जो इतरांनी वाचविणार आहे त्याला सर्व प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे.

परिस्थितीशी कसा सामना करायचा याची माहितीही त्याला असणे आवश्यक आहे. जनजागृतीसाठी शाळा महत्वाचे व प्रभावी माध्यम असून प्रत्येक शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे, असेही जी.एस. सैनी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खंजाजी यांनी केले तर आभार मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी मानले. कार्यक्रमाला मनपाच्या शाळांमधील विद्यार्थी तसेच विविध अग्निशमन संस्थांचे विद्यार्थी व अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाला महापालिकेच्या शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, कार्यक्रम समन्वयक संध्या पवार, श्रीमती दिवाटे, कलादालनाचे प्रमुख सूर्यकांत मंग्रुळकर, मधु पराड, गीता विष्णू, ज्योती कोहळे यांच्यासह मनपाच्या शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार प्रदान
आपत्ती धोके निवारण सप्ताहानिमित्त मनपाच्या शाळांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार मिळविणा-या विद्यार्थ्यांनासह आपत्ती व धोके निवारण सप्ताहात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविणा-या शाळांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कारप्राप्त विद्यार्थी
निबंध स्पर्धा : मराठी माध्यम – प्रथम क्रमांक – रोशनी क्षीरसागर, बॅरी. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन, द्वितीय क्रमांक – रहेनबी शमीन कुरेबी, प्रियदर्शिनी उच्च प्राथमिक शाळा, तृतीय क्रमांक – शुभांगी बोकडे, बॅरी. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन

हिंदी माध्यम – प्रथम – शितल सायजोडे, संजयनगर हिंदी माध्य. शाळा, द्वितीय – निशा तिवारी, वाल्मिकीनगर हिंदी माध्य. शाळा, तृतीय – किसनलाल उमरवैश, रायबहादूर गोवर्धनदास अग्रवाल हिंदी माध्य. शाळा

चित्रकला स्पर्धा : मराठी माध्यम – प्रथम – आयुष खंडारे, द्वितीय – प्रणय धुर्वे, प्रियदर्शिनी उच्च प्राथमिक शाळा, तृतीय – नवीन मागेरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय

हिंदी माध्यम – प्रथम – निशा शेख, संजयनगर हिंदी माध्य. शाळा, द्वितीय – गुंजन शर्मा, वाल्मिकीनगर हिंदी माध्य. शाळा, तृतीय – रोशनी खरवार, रायबहादूर गोवर्धनदास अग्रवाल हिंदी माध्य. शाळा

पथनाट्य : मराठी माध्यम – प्रथम – बॅरी. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन, द्वितीय – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, तृतीय – प्रियदर्शिनी उच्च प्राथमिक शाळा

हिंदी माध्यम – प्रथम – रायबहादूर गोवर्धनदास अग्रवाल हिंदी माध्य. शाळा, द्वितीय – संजयनगर हिंदी माध्य. शाळा, तृतीय – सुरेंद्रगड हिंदी माध्य. शाळा.

आपत्ती व धोके निवारण सप्ताहात सहभागी शाळा

दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी रोड, एल.ए.डी. कॉलेज, शंकरनगर, सरस्वती विद्यालय, शंकरनगर, प्रहार मिलीटरी स्कूल.