Published On : Sun, Oct 1st, 2017

दीक्षाभूमी विकास आराखडा लवकरच कार्यान्वित -देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर : दीक्षाभूमीच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा शासनाने तयार केला असून तो लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दीक्षाभूमी येथे आयोजित 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाने, आमदार नाना शामकुळे, प्रकाश गजभिये, डॉ.मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनूप कुमार, स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, श्रीमती कमलताई गवई, आनंद फुलझेले, राजेंद्र गवई, विलास गजघाटे व समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

दीक्षाभूमी येथे आज 61 वा धम्मचक्र प्रवर्तनदिन मोठ्या हर्षोलासात साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या प्रगतीचा पाया रचण्याचे काम बाबासाहेबांनी केले. बाबासाहेब हे व्यक्ती नाही तर संस्था होते. बाबासाहेब राष्ट्रनिर्माते युगपुरुष असून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच सर्वांना समानसंधी प्राप्त झाली आहे. बाबासाहेबांचे स्मारक असलेल्या दीक्षाभूमीच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा शासनाने तयार केला आहे. दीक्षाभूमीसमोरील जागेचा या आराखड्यात अंतर्भाव असून भव्यदिव्य असा विकास या माध्यमातून करण्यात येणार आहे. हा आराखडा लवकरच कार्यान्वित होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शस्त्रांशिवाय जगाला जिंकणारा एकमेव बौद्धधर्म असून जगात सर्वात प्रगत राष्ट्र असलेला जपान बौद्ध धर्माचा विचारावर जातो. आपल्या जिवनावर भगवान गौतम बुद्धाचा विचाराचा प्रभाव असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दीक्षाभूमी नेहमी उर्जा देत असून याठिकाणी बाबासाहेबांनी बौद्धधम्माची दीक्षा घेतली. बाबासाहेब हे विज्ञानवादी होते. जे समाजासाठी उत्तम आहे. तेच त्यांनी स्वीकारले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बौद्धस्थळांची शंभर कोटींची पर्यटन विकास योजना तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वंचितांचा विकास हेच सरकारचे ध्येय असून आपले सरकार बाबासाहेबांचा विचारावरच मार्गक्रमण करेल असे ते म्हणाले.

समता, समानता व न्याय हे बाबासाहेबांचे तत्व असून या तत्वानुसारच देशाची प्रगती होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. केंद्र सरकारने नदी जोड प्रकल्प ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. नदी जोड प्रकल्पाची प्रेरणा बाबासाहेबांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या गोष्टी आज आम्ही करत आहोत, जी प्रगती आज होत आहे त्या सर्व बाबी बाबासाहेबांनी त्याकाळी नमूद केल्या होत्या, असे ते म्हणाले. बाबासाहेबांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचार मनामनात रुजविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. बाबासाहेब यांचे ‘व्हिजन’ प्रेरणादायी होते. आणि त्यानुसारच देश प्रगती करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताला मजबूत करण्याचा विचार बाबासाहेबांनी दिला, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पाली भाषेचा समावेश भारतीय भाषेत व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी सांगितले. दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्यशासन प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. महापौर नंदा जिचकार म्हणाल्या की, बाबासाहेबांचे विचार आजही क्रांती घडवितात. नागपूर शहर स्मार्ट होत असून नागपूरला ‘ग्लोबल लूक’ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले शहर अस्वच्छ होणार नाही असा आज संकल्प करु या असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून दीक्षाभूमी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तो साकार होईल, अशी खात्री स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली. या प्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई यांचे भाषण झाले. दीक्षाभूमीवरील या कार्यक्रमास बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन विलास गजघाटे यांनी केले. तर आभार राजेंद्र गवई यांनी मानले.

Advertisement
Advertisement