Published On : Fri, May 26th, 2023

महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये मतभेद ; नाना पटोले यांना हटवण्याची मागणी

Advertisement

नागपूर : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या गोटात सध्या खळबळ निर्माण झाली आहे. काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य करण्यात आले असून त्यांना पदावरून हटविण्याच्या मागणीने जोर धरला आहे. पटोले कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत पक्षातील एका शिष्टमंडळाने दिल्लीत तळ ठोकला आहे, यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले.

महाराष्ट्र काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय वड्डेटीवार सध्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असल्याची माहिती आहे. मात्र या नेत्यांनी पटोले यांनाच का टार्गेट केले यासंदर्भात चर्चा सुरु आहे. अशात पटोलेंनी चंद्रपूरमधील काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळे यांची तातडीत हकालपट्टी केली होती. स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेताना पटोले यांनी हा निर्णय घेतल्याने विजय वडेट्टीवार यांनी हे पाऊल उचलले आहे.

पटोले यांच्या बदलीसाठी सध्या लॉबिंग करणाऱ्या नेत्यांमध्ये विदर्भातील दोन माजी मंत्री तसेच एका ज्येष्ठ आदिवासी नेत्याचा समावेश आहे. गुरुवारी रात्री महाराष्ट्रात परतलेल्या एका नेत्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत होतो. कोणीही आमच्यावर अटी घालू शकत नाही. एआयसीसीने महाराष्ट्रातील घडामोडींची दखल घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे.

विदर्भातील नेत्यांव्यतिरिक्त, विविध क्षेत्रातील नेत्यांनी पटोले यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांची मते केंद्रीय नेतृत्वाकडे मांडली आहेत. त्यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा असताना पटोले हे नुकतेच राहुल गांधींना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते.

पटोले यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याशी भांडण झाले होते. त्यानंतर थोरात यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या घडामोडीसंदर्भात पटोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.पण यावर त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पटोले यांच्या जवळच्या नेत्यांनी सांगितले की, दिल्लीत कितीही लॉबिंग केले तरी नेतृत्व बदल होणार नाही.