Published On : Sat, Dec 8th, 2018

हिरे व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी सचिवाला अटक

1498277033-crime_1

घाटकोपरमधील व्यावसायिक राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवार याला अटक केली आहे. सचिन पवार हा सध्या प्रकाश मेहतांसोबत कार्यरत नसला तरी घाटकोपर भाजपामध्ये तो सक्रीय असल्याचे सांगितले जाते. सचिन पवारच्या पत्नीलाही भाजपाने महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली होती.

घाटकोपरमध्ये राहणारे राजेश्वर उदानी हे हिरे आणि सोने- चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी होते. ५७ वर्षीय उदानी हे २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. अंधेरीला जातो असे सांगून ते घरातून निघाले. पण त्यादिवसापासून ते घरी परतलेच नव्हते. शेवटी या प्रकरणी उदानी यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. उदानी यांचा मृतदेह पनवेलजवळील जंगलात सापडल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. उदानी ज्या दिवशी बेपत्ता झाले त्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर सचिन पवारने १३ कॉल केले होते. या आधारे पोलिसांनी तपास करत सचिन पवारला अटक केली. पोलिसांनी सचिनची कारही ताब्यात घेतली आहे. आर्थिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे समजते. सचिनला गुवाहाटीतून अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत टीव्ही मालिकेतील एक अभिनेत्रीही होती. तिला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

सचिन पवार हा प्रकाश मेहता यांचा सचिव होता. गेल्या काही वर्षांपासून तो प्रकाश मेहतांसाठी काम करत नव्हता. पण तो घाटकोपर भाजपात सक्रीय होता. त्याच्या पत्नीला महापालिका निवडणुकीत भाजपाने उमेदवारीही दिली होती. प्रकाश मेहता यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत सचिन पवार २०१० च्या सुमारास पीए म्हणून काम करायचा असे सांगितले. मात्र, सध्या त्याच्याशी काहीच संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय क्षेत्रात वावरताना शेकडो कार्यकर्त्यांशी ओळख होते. पण ते वैयक्तिक आयुष्यात काय करतात हे माहित नसते, असे त्यांनी सांगितले.