Published On : Mon, Jul 22nd, 2019

पारशिवनी तालुक्यात कृषक जमिन अकृषक करण्याचा धडाका

कन्हान : – गेल्या काही महिन्यापासुन शासनाने तहसिलदारांना त्यांच्या कार्य क्षेत्रातील कृषक जमिन अकृषक करण्याचा अधिकार देताच पारशिवनी तालुक्यातील शेकडो एकर कृषक जमिन अकृषक करण्याचा विक्रम करावा अशा झपाटय़ाने तहसिलदार पारशिवनी यांनी कृषक जमिन अकृषक केली आहे. त्यामुळे एकीकडे कृषी क्षेत्र घटत आहे तर दुसरीकडे लेआऊट धारकांचे चांगलेच सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ चे कलम ४२ अ व ४२ ब अन्वये जिल्हाधिकारी नागपुर यांनी एका आदेशान्वये तहसिलदार यांना त्यांचे अधिनस्थ कार्यक्षेत्रात कृषक जमिन अकृषक करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यां पासुन कृषक जमिन अकृषक करण्याला वेग आला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अकृषक जमिनी करून लेआऊट टाकल्याचे दगड व फलक दिसत आहे.

गावठाणा पासुन ५०० मिटर पर्यंत अकृषक जमिन करण्याचे अधिकार असताना त्याही पुढे जाऊन २ किलोमीटर पर्यंत च्या जमिनी अकृषक केल्याचा प्रताप तहसिलदार पारशिवनी यांनी केला आहे. याच अकृषक जमिनी वर प्लॉट पाडुन लेआऊट मालक विकत आहे. या प्लॉटची खरेदी विक्री करतांना अभिन्यास नियोजन अधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे पण ते न पाहता पारशिवनी चे रजिस्ट्रार कार्याल यात खरेदी विक्रीची दस्त नोंदणी धडाक्याने सुरू आहे.

नियम बाहय रित्या केलेल्या अकृषक जमिनी व प्लॉट ची खरेदी विक्री मध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार होत असुन या माध्यमातुन असंख्य आर्थिक व्यवहार झाले असावे म्हणुन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर विनाविलंब कारवाई करून दोषीची चलअचल संपत्ती जप्त करण्याची मागणी रिपब्लिकन भिमशक्ती प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर भिमटे हयानी उपविभागीय अधिकारी रामटेक हयाना निवेदन देऊन केली आहे.