मुंबई: जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन झाले आहे. धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केली आहे.
धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून खा. चव्हाण म्हणाले की, एका ८४ वर्ष वयाच्या शेतक-याला न्याय मिळत नसल्याने मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करावी लागते ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून धर्मा पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रालयाच्या चकरा मारत होते. मंत्र्यांना त्यांनी निवेदने ही दिली होती. पण भ्रष्ट सरकारी यंत्रणेने पाटील यांच्या अर्ज आणि निवेदनावर काहीच कारवाई केली नाही. तीन महिने पाठपुरावा करूनही सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजाने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
जे.जे. रूग्णालयात ते सहा दिवस मृत्यूशी झुंज देत होते पण मुंबईत असूनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रूग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस करण्यास वेळ मिळाला नाही हे दुर्देवी असून सरकारची असंवेदनशीलता दर्शवणारे आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे गेल्या साडेतीन वर्षात साडे तेरा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करतायेत. शेतक-यांची मुले-मुलीही आत्महत्या करू लागले आहेत त्यांचा सरकारवर नाही, त्यामुळे राज्यातील सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

