मुंबई : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे. मी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला. मुंडे यांचा राजीनामा स्वीकारुन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडून केली जात होती.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून सीआयडीच्या आरोपपत्रात वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याच समोर आल्यानंतर ही मागणी अधिक जोर धरू लागली होती. अखेर आज मुंडेंनी त्यांच्या पीएमार्फत मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.