Published On : Tue, Jun 12th, 2018

धनंजय मुंडेंना मोठा धक्का; पंकजा मुंडेंचे समर्थक सुरेश धस विजयी

Advertisement

बीड : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या भावा-बहिणीने प्रतिष्ठेच्या केलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत धंनजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक सुरेश धस हे विजयी ठरले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले पराभूत झालेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांनी फेरमतदानाची मागणी केली आहे.

आज संपन्न झालेल्या मतमोजणीत सुरेश धस हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. त्यानंतर अंतिम फेरीनंतर धस यांना ५२६ मत प्राप्त झाले. तर मतपत्रिकेवर सांकेतिक आकडे लिहले असल्याने २५ मते बाद ठरली. सुरेश धस यांनी ७४ मते अधिक घेऊन अशोक जगदाळेंना पराभूत केले. दरम्यान बॅड करण्यात आलेल्या मतांच्या मुद्द्यावरून सुरेश धस आणि अशोक जगदाळें यांच्यात मतमोजणीच्या ठिकाणीच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अशोक जगदाळे यांनी फेरमतदानाची मागणी केली आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी त्यांची मागणी मान्य करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या भावा-बहिणीतील राजकीय द्वंद्वामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक असणारे रमेश कराड यांना राष्ट्रवादीच्या गोटात दाखल करून धनंजय मुंडे यांनी भाजपावर कुरघोडी केली होती.

मात्र, ऐनवेळी रमेश कराड यांना निवडणुकीचा अर्ज मागे घ्यायला लावून पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने धनंजय मुंडे यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत रंगली होती. या मतदारसंघासह राज्यातील इतर सहा जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक झाली होती. त्यानंतर वाद निर्माण झाल्याने ही जागा वगळता सर्व जागांचे निकाल २४ मे रोजी जाहीर झाले होते.