Published On : Thu, Aug 31st, 2017

बांधवांनो संघटीत व्हा

Advertisement
 
  • बाबासाहेबांचा मूलमंत्र अंगी बाळगावा
  • भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांचा धम्मसंदेश

Bhadant Surai Sasai
नागपूर
: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शोषित आणि पीडित बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला. या मूलमंत्रामुळे हजारो वर्षांपासून गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजबांधवांमध्ये जागृतीच्या सूर्याची किरणे पडली. त्यांना होणाºया अन्यायाची जाणीव झाली. परिणामी आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. शिक्षणामुळे जगण्याची दृष्टी आली. समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची उर्मी मिळाली. मात्र, महामानवाचा संघटीत व्हा हा मूलमंत्र अंगी बाळगला नाही. शिक्षणात प्रगती केली, संघर्षही केला. परंतु, संघटीत नसल्यामुळे शिक्षणात प्रगती करूनही त्या प्रगतीला अर्थ उरला नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजाने संघटीत होण्याची आज खरी गरज आहे, असा धम्म संदेश बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये जीवन जगण्याचे सामर्थ्य आहे. आपले जीवन सुखकर घडवायचे असेल तर त्यांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन केले. भदंत ससाई पुढे म्हणाले, जगाच्या कानाकोपºयात बाबासाहेबांचे विचार पसरलेले आहेत. त्यांचे विविध विषयांवरील चिंतन खूप मोठे आहे.

आजचा भारत त्यांच्या विचारांमुळे कसा बदलतो आहे. प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीला त्यांचे विचार प्रेरक आणि प्रेरणादायी आहेत. बदलत्या भारताच्या प्रगतीत डॉ. आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक आहेत. मात्र, सर्वच जण बाबासाहेबांना मानतात असे नाही. परंतु त्यांच्या विचारांवर चालतात. दुसरीकडे जे बाबासाहेबांना मानतात ते त्यांच्या विचारांची कास धरत नाही. त्यामुळे समाजाची प्रगती खुंटली आणि समाज संघटीत होऊ शकला नाही. आता बाबासाहेबांचा विचार आत्मसात करण्याची गरज आहे. किंबहुना त्यांच्या विचारावर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल आणि जीवन सुखमय करता येईल.

माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि तो इतरांचा द्वेष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो. त्यामुळे इतरांचा द्वेष करू नका. कितीही मोठे असाल तरी पाय जमिनीवरच राहू द्या. कोणाचे मन दुखवू नका. कोणालाही कमी लेखू नका. बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका. अडचणीत सापडलेल्या समाजबांधवाला मदतीचा हात द्या. एकसंघ व्हा आणि प्रगतीचे शिखर गाठा म्हणजे सर्वत्र शांती निर्माण होईल. कारण आज जगाला शांतता, प्रेम, करुणा आणि मैत्रीची खºया अर्थाने गरज आहे, असेही भदंत ससाई यांनी आपल्या धम्मसंदेशात म्हटले आहे.