Published On : Thu, Sep 15th, 2022
By Nagpur Today Nagpur News

धम्मचक्र प्रवर्तन दिन: दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस येथे आवश्यक सुविधा तयार ठेवा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

Advertisement

नागपूर : कोविड साथीनंतर प्रथमच होणाऱ्या 66 व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त देश-विदेशातून येणाऱ्या बौद्ध अनुयायांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही. याची काळजी सर्व यंत्रणांनी घ्यावी, त्यानुसार व्यवस्था संदर्भात काटेकोर नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिले.

नागपूर येथील दीक्षाभूमी, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि चिचोली येथील शांतिवन येथे 3 ते 6 ऑक्टोबरदरम्यान आयोजित धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त डॉ. इटनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात व्यवस्थेचा पूर्वतयारी आढावा घेतला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, कामठी येथील ड्रॅगन पॅलेसच्या सुलेखा कुंभारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस येथे येणाऱ्या लाखो अनुयायांना कोणत्याही प्रकारची उणीव राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

त्यासाठी दीक्षाभूमी येथे महानगरपालिकेने झोनल अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली शुद्ध पिण्याचे पाणी 24 तास उपलब्ध करुन द्यावे. आवश्यकतेनुसार स्टँड पोस्ट, टँकर व पीव्हीसी पाईपची व्यवस्था करावी. तसेच दीक्षाभूमी परिसरातील साफसफाई व स्वच्छतेसंबंधी योग्य ती काळजी घेण्याबाबत आदेश दिले.

अनुयायांच्या आरोग्याच्या दृष्टीने फिरते रुग्णालय, पुरेशा फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी. अंबाझरी व फुटाळा तलावावर सुरक्षारक्षक बोटीसह‍ यंत्रणा सज्ज ठेवावी, आरोग्य विभागाने पुरेशा डॉक्टरांची सेवा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 3 ते 6 ऑक्टोबरदरम्यान प्रकाशव्यवस्था, विद्युत खंडीत होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश महावितरणला दिले.

शहर बस आणि एस. टी. महामंडळाकडून उत्सव काळादरम्यान पुरेशा बसेस उपलब्ध करुन देण्याचे आणि वाहतूक शाखेच्या उपायुक्तांशी समन्वय ठेवून योग्य मार्गाने विनाअपघात व्यवस्था ठेवावी. तसेच औषधोपचार आणि तात्पुरते रुग्णालयांची व्यवस्था पुरेशा प्रमाणात करावी. पोलिस यंत्रणेने वाहतुकीचे मार्ग आणि सुरक्षा व्यवस्था चोख बंदोबस्तात ठेवावा.

मान्यवरांच्या भाषणादरम्यान ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही यावेळी दिले. अन्नदान वाटपाच्या स्टॉल्सधारकांनी गर्दी होणार नाही हे लक्षात घेऊन स्टॉल्स उभारावेत. दीक्षाभूमी परिसरात आपत्तीव्यवस्थापन कक्ष आणि आगीसंबंधी अग्निशमन विभागाने पोर्टेबल फायर एक्सटिंगविशर सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.

होर्डींग्ज व सूचनाफलक व्यवस्था, आकस्मिक पाऊस आल्यास अनुयायांसाठी पर्यायी आणि जवळच निवासव्यवस्था ठेवावी. नियंत्रण कक्ष आणि पोलिस विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत यावेळी संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात आले.

उत्सव काळादरम्यान पोलिस विभागाला मदत करण्यासाठी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांनी सांगितले. याशिवाय ऐनवेळी आलेल्या सूचनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

Advertisement
Advertisement