Published On : Sat, Oct 2nd, 2021

लसीची दुसरी मात्रा घेतलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश – कोरोना लस घ्या मिळवा; खरेदीवर सूट

चंद्रपूर : सध्यास्थिती कोरोनाची लाट ओसरल्याने येत्या सात ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे खुली करण्याचा विचार राज्यसरकार करीत आहे. येत्या आठवड्यात नवरात्रीनिमित्त मोठी गर्दी होऊन पुन्हा कोरोना वाढू नये, यासाठी मंदिरात प्रवेश करताना भक्तांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्याच्या निर्णयावर मनपाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच लसीकरण करणाऱ्या ग्राहकांना खरेदीवर सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

चंद्रपूर शहरातील कोरोना लसीकरणाचा टप्पा वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील व्यापारी मंडळ, मंदिर संस्थान आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात पार पडली. या बैठकीला महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपिन पालीवाल, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वनीता गर्गेलवार यांच्यासह आरोग्य आणि स्वच्छता विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखून धरण्यासाठी कोरोना लसीकरण अत्यावश्यक आहे. चंद्रपूर शहरातील एकूण पात्र नागरिकांपैकी सद्यस्थितीत 50 टक्क्यांहून अधिक लसीकरण झालेले आहे. मात्र संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने लसीकरणावर अधिक भर देण्याचा प्रयत्न चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मार्फतीने केला जात आहे. या लसीकरणाच्या उपक्रमाला लोकसहभाग मिळावा, यासाठी व्यापारी मंडळ, किरकोळ विक्रेते, सराफा व्यवसायिक, मंदिर संस्थानचे पदाधिकारी यासह सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

कोरोनामुळे दीड वर्षापासून शाळा, धार्मिक स्थळे, सार्वजनिक उत्सव, कार्यक्रमांवर बंदी आहे. परंतु, हळूहळू सर्व व्यवहार सुरू करण्यात येत आहे. राज्य शासनाने ८ वी ते १२ वी वर्गापर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता ५ ते ७ पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळे सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत लसीकरणावर भर देण्यात येत आहे.
चंद्रपूर शहरातील व्यापारी, त्यांचे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत फेडरेशन ट्रेङ ऑफ कॉमर्स इन्डस्ट्रीच्या पुढाकारातून जलाराम मंदिर येथे केंद्र सुरू आहे. यात आणखी प्रतिसाद मिळविण्यासाठी कोरोना लस घेणाऱ्याना विशेष बक्षिसदेखील देण्यात येणार आहे.