Published On : Wed, Jul 21st, 2021

देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी कोरोनामध्ये मृत पावलेल्या २०० परिवारांना हेल्थकार्डचे वितरण करणार : संदीप जोशी

नागपूर : कोरोनाच्या भीषण संकटामध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झालीत. मुलांच्या डोक्यावरून आई, वडील किंवा दोघांचेही छत्र हिरावले गेले. अशा मुलांच्या संगोपणाची संपूर्ण जबाबदारी माजी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, झिल्पी हिंगणाद्वारे ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाच्या माध्यमातून स्वीकारण्यात आली. आतापर्यंत ‘सोबत’च्या माध्यमातून २०० परिवारांच्या संगोपणाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. या परिवारांना वेळेवर योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने त्यांना नि:शुल्क ‘हेल्थकार्ड’ दिले जाणार आहे.

२२ जुलै रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी या परिवारांना हे ‘हेल्थकार्ड’ महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन (एमबीए)चे अध्यक्ष अरूण लखानी यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध मनोचिकीत्सक डॉ. प्रबोध सर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरीत करण्यात येणार आहेत. उत्तर अंबाझरी मार्गावरील बी.आर.मुंडले सभागृहामध्ये या परिवारांना ‘हेल्थकार्ड’चे वितरण करण्यात येईल, अशी माहिती माजी महापौर तथा ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली आहे.

Advertisement

दीड महिन्यापूर्वी माजी महापौर संदीप जोशी यांनी श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, झिल्पी हिंगणाद्वारे ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाच्या माध्यमातून कोव्हिडमुळे एक किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेनंतर त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नागपूर शहरातील २०० परिवारांनी सोबतकडे अर्ज सादर केले. अर्जदारांच्या घरी जाउन ‘सोबत’च्या कार्यकर्त्यांनी पडताळणी केली. त्यानंतर विहित निकषांच्या आधारे आतापर्यंत २०० परिवार या ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पामध्ये पात्र ठरले आहेत. या सर्व परिवारांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी तज्ज्ञांकडून करून त्यांना योग्य उपचार मिळावे, महिलांची स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तर बालरोगतज्ज्ञां कडून बालकांची तपासणी केली जावी व त्यांना योग्य उपचार घेता यावे, यासाठी या परिवारांना आयुष्यभराकरीता ‘हेल्थकार्ड’ वितरीत करण्यात येणार आहे. या परिवारांच्या ‘हेल्थकार्ड’ संदर्भात प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पॅनल गठीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध डॉक्टरांनी ‘सोबत पालकत्व’ च्या कार्याला साथ देत या परिवारांच्या आरोग्याच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे.‌ डॉक्टरांच्या या सहकार्याबद्दल ‘सोबत पालकत्व’चे अध्यक्ष संदीप जोशी यांनी मनापासून त्यांचे आभार मानले आहेत.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनलमध्ये बालरोग तज्ज्ञ डॉ. सुहास देशपांडे, डॉ. शिल्पा भोयर, डॉ. संदीपा पारस्कर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सीमा दंदे, डॉ. वैदेही मराठे, डॉ. सुषमा देशमुख, जनरल फिजीशियन डॉ. कमल भुतडा, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे, डॉ. प्रबोध, सर्जन डॉ. राज गजभिये, डॉ. प्रमोद गिरी यांचा समावेश आहे.

पालकांचे छत्र हरविलेल्यांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ‘सोबत पालकत्व’ने या कुटुंबांच्या संगोपनाला सुरूवात केली आहे. त्यातूनच कुणाला नोकरी मिळवून दिली तर कुणा विद्यार्थ्याच्या शाळेतील शैक्षणिक शुल्क भरून दिले आहे. याच सेवाकार्यात आता त्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी ‘हेल्थकार्ड’ च्या माध्यमातून घेतली जाणार आहे. २२ जुलै रोजी वाढदिवसानिमित्त कुणीही होर्डींग, बॅनर आदी काहीही न लावता सेवाकार्यामध्ये योगदान देण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा राज्य विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या या शब्दांना अनुसरून व आवाहनाला प्रतिसाद देत संदीप जोशी यांनी त्यांच्या जन्मदिनी ‘हेल्थकार्ड’ वितरणाचा पुढाकार घेतला आहे. या वितरण समारंभाला नागरिकांनी कोव्हिड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करूनच उपस्थित रहावे, असे आवाहन ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement