Published On : Mon, Sep 26th, 2022
By Nagpur Today Nagpur News

राज्य शासनाच्या पत्रकारिता पुरस्काराचे लवकरच वितरण करणार – देवेंद्र फडणवीस

· स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण
·राहुल पांडे आणि महेंद्र सुके हे पुरस्काराने सन्मानित

नागपूर : आज पत्रकारिता ही कितीही संक्रमणाच्या काळातून जात असली तरीही देशात पत्रकारिता टिकली तरच लोकशाही टिकेल. तिचे मूल्य जीवंत ठेवण्याचे कार्य सुरुच ठेवूयात. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्राबाबत काळजी करण्याचे कारण नाही. राज्य शासनाकडून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना दिले जाणारे पुरस्कार मागील तीन वर्षापासून दिले गेले नाहीत. त्या पुरस्कारांचे लवकरच वितरण करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Gold Rate
Saturday08 Feb. 2025
Gold 24 KT 85,100 /-
Gold 22 KT 79,100 /-
Silver / Kg 95,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने ‘स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार 2021’ च्या पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि मुंबई सकाळचे संपादक महेंद्र सुके यांना प्रेस क्लब येथे त्यांच्या हस्ते करण्यात आले. रोख एकवीस हजार, शाल, श्रीफळ व स्मृतचिन्ह देवून गौरविण्यात आले.

माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यावेळी व्यासपीठावर उपस्थितीत होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यातील पत्रकाराचे प्रश्न समजावून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविणार असल्याचे सांगून राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना थांबल्या होत्या. त्या सर्व योजना राबविण्याला प्राधान्य देणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. नागपूर येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्रमिक पत्रकार संघांच्या वतीने गेल्या चार दशकापासून पत्रकारितेत उत्कृष्ठ काम करणा-या पत्रकारांना पुरस्कार दिला जातो. ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते स्व. उमेशबाबू चौबे यांच्यापासून सुरु झालेला पत्रकारिता पुरस्कार आज दोन मान्यवरांना मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

राहुल पांडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना ते या पुरस्काराचे मानकरी ठरल्याबद्दल श्री. फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच पत्रकारितेमध्ये न्यायालयाचे काम पाहून जे कामकाज चालते त्या कामकाजाचे वृत्तांकन केले. कुठल्याही गोष्टीला सकारात्मक विचार करून त्या पद्धतीने वृत्तांकन करण्याचे काम त्यांनी सुरुवातीपासूनच केले असल्याचे सांगून आता राज्य माहिती आयुक्त पदावर काम करताना त्यांनी माहिती अधिकारचा गैरवापर करुन ब्लॅकमेलींग करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्याकडून होणार असल्याचा आशावाद उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच मूळचे नागपूरचे आणि आता मुंबई येथे स्थायिक झालेले सकाळचे संपादक महेंद्र सुके यांनी पत्रकारिता करतानाच नाट्य लेखन, समीक्षणासह पत्रकारितेला साहित्याची जोड दिली. त्यांच्याकडून संवेदनशील पत्रकारिता होत आहे. श्री. सुके यांचा पत्रकारितेचा प्रवास चांगला सुरु असून, त्यांचे अजून बरेच काही बाकी असल्याबाबत जीवनात सतत आशावादी आणि कार्यतत्पर राहण्याबाबत त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूती विकास सिरपूरकर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना पत्रकारिता हे वृत आहे, असे सांगून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे उदाहरण देत पत्रकार हा कान, नाक, डोळे सतत उघडे ठेवून बातमीचा सतत शोध घेणारा असला पाहीजे. त्याची पत्रकारिता ही समाजाच्या भल्यासाठी असली पाहीजे. समाजोपयोगी पत्रकारिता न्यायमूर्ती श्री. सिरपूरकर यांनी महाभारतातील संजयाची दृष्टी ठेवली पाहीजे, असे सांगून अशी पत्रकारांना अशी दृष्टी लाभली तरच देशातील लोकशाही टिकेल आणि जगेल, असा आशावाद व्यक्त करत श्री. पांडे आणि श्री. सुके यांना शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना श्री. पांडे यांनी पुरस्काराचे श्रेय आई- वडील, पंजाबचे राज्यपाल तथा दै. हितवादचे विश्वस्त बनवारीलाल पुरोहीत, संपादक विजय फणशीकर यांना दिले. पुरस्कार कधी मिळाला यावर त्याचे मूल्य ठरत नाही तर तो मिळाला हे महत्त्वाचे असते, असे सांगितले. या पुरस्काराच्या रक्कमेमध्ये श्री. पांडे यांच्याकडून अधिकची पाच लाख रुपयांची रक्कम देशाच्या आंतरिक सुरक्षेच्या प्रश्नावर अभ्यास करणाऱ्या एखाद्या उमद्या, तरुण पत्रकाराला फेलोशीप मिळावी, असे त्यांनी सांगितले.

माध्यमांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे खूप मोठे आव्हान आहे. माध्यमांमध्ये काम करणा-या वृत्तपत्र प्रतिनिधींना खूप मोठा संघर्ष करावा लागतो आहे. माध्यमांबाबत सर्वसामान्य नागरिकांचे असलेले अज्ञान हा एक मोठा प्रश्न आहे. माध्यमांमध्ये काम करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना मिळणाऱ्या वेतनाच्या बाबीकडे श्री. पांडे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

महेंद्र सुके यांनी नागपुरातील त्यांच्या पत्रकारितेला विविध अनुभवांतून उजाळा दिला. माध्यमांमध्ये काम करताना ते नाट्यलेखन, निर्मिती आणि समीक्षेकडे कसे वळले, याबाबतही त्यांनी सांगितले. या क्षेत्रामध्ये काम करताना त्यांचा नागपूर येथील पत्रकारिता करण्यामध्ये तत्कालीन संपादक अनिल महात्मे यांना श्रेय दिले.

तत्पूर्वी सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी प्रास्ताविकात पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांना शुभेच्छा दिल्या. तर कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रेस क्लब नागपूरचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी केले तर ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांनी आभार मानले.

Advertisement