Published On : Fri, Sep 15th, 2017

महाराष्ट्रात फुटबॉल फिव्हर; किक बसू लागल्या!

Advertisement

‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ या उपक्रमाअंतर्गत सरकारनं राज्यभरात आयोजित केलेल्या फुटबॉल महोत्सवाचा काही वेळापूर्वीच शुभारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिमखाना इथं या महोत्सवाचं उद्घाटन केलं. राज्याच्या विविध जिल्ह्यांत शेकडो शाळांतील मुलं मैदानात उतरली असून फुटबॉलला ‘किक’ बसू लागल्या आहेत. दिवसभरात सुमारे १० लाख विद्यार्थी फुटबॉल खेळतील, असा अंदाज आहे.

पुढील महिन्यात भारतात आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी राज्य सरकारच्या क्रीडा विभागानं हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांनी मैदानात येऊन खेळावं, देशात फुटबॉलला चालना मिळावी, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. याअंतर्गत मुंबई जिमखाना इथं आठ वेगवेगळे सामने होणार असून एकट्या मुंबईत तीन लाखांहून अधिक मुले-मुली फुटबॉल खेळणार आहेत. शाळा-महाविद्यालयांमधील मैदानांव्यतिरिक्त सुमारे २०० मैदानांची यासाठी आखणी करण्यात आली आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांनीही फुटबॉल खेळला होता.

कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं. जळगावात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी किक मारून महोत्सवाचा शुभारंभ केला.