Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Apr 24th, 2021

  फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते, पण आता उतावीळपणे चुकीचं पावलं टाकली, माजी IPS ने कान टोचले

  मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी महाराष्ट्रातील कोरोना संकटात विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळावरुन, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची कानउघडणी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. मात्र सध्या मुख्यमंत्रिपदासाठी ते उतावीळ झाले असून, त्यांच्याकडून चुकीची पावलं टाकली जात आहेत. माजी मुख्यमंत्री, आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कार्यकाळात गृहमंत्री म्हणून लागू केलेल्या कायद्याचा भंग करू नये, असं ज्युलिओ रिबेरो म्हणालेत. रिबेरो यांनी ‘ द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी कायदा दाखवत कान उपटले आहेत. (Devendra Fadnavis ought to moderate his impulses says Julio Ribeiro)

  रेमडेसिव्हीर प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये जाणं चुकीचं
  ज्युलिओ रिबेरो यांनी देवेंद्र फडणवीस यांना कायदा दाखवला आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन तुटवड्या ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालकांना जेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी आणले, त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा पोलीस स्टेशनला गेले. खरंतर रेमडेसिव्हीर इंजेक्शन कोणाला वैयक्तिक किंवा संघटनांना मिळत नाही. मी आधीच म्हटल्याप्रमाणे कोव्हिड संकटात केवळ राज्य सरकारलाच फॅक्टरीतून इंजेक्शन वितरकांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. मात्र, तरीही ब्रूक फार्माच्या पाच वेगवेगळ्या गोदामांमध्ये इंजेक्शन्सचा साठा कसा आढळून आला, हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे.

  मात्र, ब्रूक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ते गृहमंत्री असताना केलेला नियमच मोडीत काढला. राज्याच्या सुव्यवस्थेचे आणि कायद्याचे प्रतिक असलेल्या पोलीस ठाण्यात जाणे, त्याठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालणे, अधिकाऱ्यांची चढ्या आवाजात बोलणे या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या पदाला साजेशा नव्हत्या. फडणवीस यांनी त्यांचा संयम गमावला, असे रिबेरो यांनी म्हटले आहे.

  त्यासाठी ज्युलिओ रिबेरो यांनी 1980 साली ते मुंबईच्या आयुक्तपदी असतानाचा एक किस्सा सांगितला. त्यावेळी वसंतदादा पाटील यांचे सरकार होते. तेव्हा सत्ताधारी काँग्रेस पक्षातील आमदार भाऊराव पाटील आणि ए.आर. अंतुले यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन तेथील प्रमुखांना शिवीगाळ केली होती. हा प्रकार मला समजला तेव्हा मी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच हे प्रकरण दंडाधिकारी न्यायालयसमोर मांडून भाऊराव पाटील यांना समन्स बजावण्याची मागणी केली.

  त्यानुसार न्यायालयाने समन्सही जारी केले. मात्र, भाऊराव पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, जामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर भाऊराव पाटील यांनी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधून हे प्रकरण बंद करण्याची मागणी केली. तेव्हा आमदाराने संबंधित अधिकाऱ्याची माफी मागितल्यास हे प्रकरण बंद करण्याची तयारी मी दर्शविली. मात्र, भाऊराव पाटील हे माझी म्हणजे आयुक्तांची माफी मागायला तयार होते पण त्या अधिकाऱ्याची माफी मागण्यास तयार नव्हते. मला हा प्रस्ताव मान्य नव्हता. त्यानंतर हे प्रकरण मी मुंबईच्या आयुक्तपदी असेपर्यंत थंडच राहिले. मात्र, आतादेखील त्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी, असे ज्युलिओ रिबेरो यांनी म्हटले.

  ‘फडणवीस उतावीळपणा करतायत, नसता धोका ओढवून घेतायत’
  सध्या भाजप महाविकासआघाडी सरकारवर कुरघोडी करण्यासाठी टोकाला जाताना दिसत आहे. सुशांत सिंह प्रकरणात भाजपचा हा प्रयत्न फसला. सचिन वाझे प्रकरणात भाजप काहीप्रमाणात यशस्वी ठरली. आतादेखील भाजपने तेच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या लोकांच्या डोक्यात कोरोनाचा विषय आहे. त्यामुळे रेमडेसिविरचे प्रकरण एका मर्यादेपलीकडे ताणून धरणे मूर्खपणाचे आहे, असे ज्युलिओ रिबेरो यांनी म्हटले. लोकांना हा प्रकार फारसा रुचणारही नाही, असा इशाराही रिबेरो यांनी दिला.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145