नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा नागपूर द्वारे सुरू असलेल्या विविध कम्युनिटी किचन ला भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
लॉकडाऊन सुरू होऊन आज 50 दिवसांचा कालावधी उलटला. या 50 दिवसांपासून नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निःस्वार्थ सेवाकार्य करीत आहे. रोजंदारी मजूर, भटके लोकं, कामगार वर्ग ज्यांचा रोजगार लॉकडाऊनच्या काळात बंद झाला आहे, अशा व्यक्तींना अन्नदान करीत आहे. या शहरात कुणीही उपाशी राहू नये, याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यायची, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
या आवाहनाला साद देत कार्यकर्त्यांची फौज सेवाकार्यात रमली. शहरातील विविध भागात कम्युनिटी किचन सुरू करून तेथून नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरजवंताना अन्न पुरविण्याचे कार्य सुरू झाले. या कार्याचे नागरिकांत कौतुक होऊ लागले. निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील विविध कम्युनिटी किचनला भेट दिली. सुरू असलेल्या सेवकार्याची माहिती जाणून घेतली. मध्य नागपूर, दक्षिण नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर, पश्चिम नागपुरातील किचनला भेट देत सेवाकार्य असेच सुरू राहू द्या, असे आवाहन करीत कौतुक केले.
निःस्वार्थ सेवा करत असलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. जयताळा येथील एकात्मता नगर येथेही महापौर संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात दररोज दोन हजार नागरिकांना भोजन दिले जाते.भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी पारेंद्र (विक्की) पटले आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे हे कार्य अविरत सुरू आहे. तेथेही श्री. देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
यानंतर श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भेट देऊन नव्याने उभारण्यात आलेल्या आयसीयू वॉर्डची पाहणी केली आणि काही रुग्णांसोबत व्हिडिओ काॅलवर संवाद साधला. यावेळी नागपूर शहर भाजप अध्यक्ष प्रवीण दटके, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन भाऊ मते, मध्य नागपूरचे आमदार विकासभाऊ कुंभारे, मंडळ अध्यक्ष श्री किशोर पलांदुरकर उपस्थित होते.
