Published On : Fri, Aug 14th, 2020

विविध उद्योगांचे समूह निर्माण करून विकास व्हावा : नितीन गडकरी

Advertisement

‘एमएसएमई मेंबर बॉडीज अ‍ॅण्ड सेक्टरल असो.’शी संवाद

नागपूर: कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागाचा विकास करताना विविध उद्योगांचे समूह (क्लस्टर) निर्माण करून त्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यास विकासाचे नवीन मॉडेल तयार होईल आणि रोजगार निर्मिती होईल व सर्वसामान्य माणसाची क्रयशक्ती वाढेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक, परिवहन व सूक्ष्म मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

‘एमएसएमई मेंबर बॉडीज अ‍ॅण्ड सेक्टरल असो.’शी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते संवाद साधत होते. कोविडमुळे संपूर्ण जगच संकटात सापडले असल्याचे सांगताना ना.गडकरी म्हणाले- भय, निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी उद्योगांसह सर्वच क्षेत्रासमोर संकट उभे झाले आहे. या स्थितीतून सावरण्यासाठी सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करून समाजाच्या आणि लहान व्यावसायिकांच्या पाठ़ीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

कोविडमुळे अर्थव्यवस्थाही संकटात सापडली असून उद्योग, एमएसएमई, व्यापारी, बँका, सरकार सर्वच जण आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- देशातील जनतेने यापूर्वीही नैसर्गिक आणि नक्षलवाद, दहशतवाद, चीन व पाकशी युध्दे अशा संकटांचा यशस्वी सामना करून त्यावर मात केली आहे. कोविडच्या संकटावर आपण निश्चितपणे मात करू. एकदा प्रतिबंधक लसीची निर्मिती झाली की सर्व व्यवहार सुरळीत होतील.

अशा स्थितीत उद्योगांमध्ये खेळते भांडवल आणि परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आली तर अर्थव्यवस्थेला गती मिळेल. रोजगार निर्मिती होईल. मागणी व पुरवठा यांचा समन्वय साधणे शक्य होईल. देशातील सर्वच क्षेत्रात असलेल्या उद्योगांना आयातीत मालाला पर्याय निर्माण करण्याची आज देशाची गरज असून निर्यात वाढविण्याची गरज आहे. अशा स्थितीत कोणते धोरण असले पाहिजे याचा विचारही केला जावा, असेही ते म्हणाले.

सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांना वित्तीय साहाय्य करता यावे यासाठी सामाजिक सूक्ष्म वित्तीय संस्थांची निर्मिती करून उद्योगांना 10 लाखांपर्यंत पतपुरवठा करणे आवश्यक असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- यावर अभ्यास करून धोरण तयार केले जावे. या वित्तीय संस्थांमध्ये कृषी आणि ग्रामीण भागात असलेल्या लहान उद्योग-व्यावसायिकांचे व्यवसाय सुरु होतील. बाजारात खेळते भांडवल येईल, असे सांगताना डिजिटलायझेन, ई मार्केटिग यावर भर देताना ते म्हणाले- नवीन तंत्रज्ञान व कौशल्याचा वापर करून उत्पादन खर्चात, वाहतूक खर्चात, वीज खर्चात, मजुरांसाठी होणार्‍या खर्चात बचत करणे आवश्यक आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.