Published On : Mon, Mar 8th, 2021

सहा विधानसभा क्षेत्रातील सहा मैदानांचा होणार विकास : क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने

Advertisement

क्रीडा विशेष समितीच्या बैठकीत निर्णय

नागपूर : शहरातील खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्‍यात या उद्देशाने शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातील सहा मैदानांची पाहणी करून खेळाडूंना खेळण्यासाठी उपयुक्त असे मैदान तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या संदर्भात आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करा असे निर्देश क्रीडा समितीचे नवनिर्वाचीत सभापती प्रमोद तभाने यांनी दिले. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सरावासाठी त्यांना येत असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी उपसभापतीसोबत शहरातील विविध मैदाने आणि क्रीडा संकुलांची पाहणी करणार असल्याचेही प्रमोद तभाने यांनी सांगितले. सोमवारी (ता. ८) क्रीडा विशेष समितीची बैठक पार पडली. त्यावेळी क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने बोलत होते.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत क्रीडा समितीचे उपसभापती लखन येरवार, सदस्य सर्वश्री अमर बागडे, शेषराव गोतमारे, नरेंद्र वालदे, सदस्या रूपाली ठाकूर, उपायुक्त मिलिंद मेश्राम, मनपा शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, क्रीडा नियंत्रण अधिकारी नितीन भोळे आदी उपस्थित होते.

क्रीडा विशेष समितीचे सभापती प्रमोद तभाने म्हणाले, विधानसभानिहाय मैदानाचे सर्वे करून योग्य मैदानाची निवड करण्यात येईल. निवड केलेल्या मैदानाचा विकास आराखड्यानुसार विकास करण्यात येईल. प्रमोद तभाने पुढे म्हणाले की, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरातील सर्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास बंदी आहे. मात्र खेळाडूंना सरावासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतू क्रीडा स्पर्धामुळे खेळाडूंना जी प्रेरणा मिळते ती केवळ सराव करून मिळत नाही. यामुळे खेळाडूंचे खूप नुकसान होत आहे. म्हणून शहरात कमी खेळाडू असलेल्या स्पर्धाचे आयोजन करण्याची परवानगी घेण्यासंदर्भात नियमावली तयार करून तसा प्रस्ताव राज्यसरकारकडे पाठविण्याची सूचना यावेळी सभापती प्रमोद तभाने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

सध्या शहरात नागपूर महानगरपालिकेचे ४ क्रीडा संकुल, ४ स्केटिंग रिंग आणि विभागाद्वारे संचालित ५ व्‍यायाम शाळा आहेत. तसेच कबड्डी, कुस्ती, आणि खो-खो या खेळांसाठी प्रत्येकी २-२ मॅट घेण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर यांनी दिली.