Published On : Sat, Jul 13th, 2019

अमरावतीच्या धर्तीवर पश्चिम विदर्भातील विमानतळांचा विकास -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

अमरावती: विमानसेवेमुळे उद्योजक गुंतवणूकीस त्या क्षेत्राला प्राधान्य देतात. पश्चिम विदर्भात अस्तित्वात असलेल्या तीन विमानतळांच्या विस्तारास प्राधान्य देण्यात आले आहे. आज अमरावती येथील विमानतळ विकसित होत असताना अकोला आणि यवतमाळ येथीलही विमानतळांचा विकास करण्यात येणार आहे. या विमानतळांच्या विस्तारीकरणामुळे पश्चिम विदर्भाचा चेहरामोहरा बदलणार असून अनेक नवीन उद्योग या ठिकाणी येऊन औद्योगिक विकासाला चालना मिळेल. शासनाच्या या प्रयत्नामुळे विमानचालन नकाशावर जिल्ह्याचे नाव कोरले जाईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले.

अमरावती येथील बेलोरा विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपूजन आणि विविध कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे, सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, राज्य शिक्षण सल्लागार परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, महापौर संजय नरवणे, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार सर्वश्री प्रविण पोटे -पाटील, अरुण अडसड, विरेंद्र जगताप, ॲड. यशोमती ठाकूर, रवी राणा, रमेश बुंदिले, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केलेल्या बेलोरा विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपूजन आज होत आहे. बेलोरा विमानतळ धावपट्टीच्या विस्तारीकरणामुळे मोठ्या आकाराची विमाने रात्रीही उतरविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. कुठल्याही शहराच्या औद्योगिक विकासासाठी रस्ते, वीज, पाणी, रेल्वेमार्ग यासह आज विमान वाहतूक सुविधा असणे अत्यावश्यक झाले आहे. विमानसेवा असलेल्या शहरांचा औद्योगिक विकास वेगाने होत आहे.

केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनामुळे विमानसेवेतील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांनाही किफायतशीर दरात विमानप्रवास करता येणे शक्य झाले आहे. यामुळे विमानसेवेमध्ये विकासाची गती तीस टक्क्यांपर्यंत वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही विमान प्रवास करता यावा, यासाठी शासन प्रयत्नरत आहे. ‘उडान’ योजनेमध्ये बेलोरा विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. बेलोरा विमानतळावरुन सुरवातीला मुंबईसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर देशातील चार महत्वाच्या शहरामध्ये याठिकाणहून सेवा सुरू करण्यात येईल. विस्तारीकरणासोबतच विमाने रात्री उतरू शकतील अशी सुविधाही निर्माण करण्यात येईल. विमानतळाच्या विकासामुळे अमरावतीचे नाव विमानचालनाच्या नकाशावर येणार आहे.

विस्तारीकरणामुळे बेलोरा विमानतळावर मोठ्या आकाराची विमाने उतरविण्याची सुविधा होईल. यामुळे नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीतील वस्त्रोद्योग पार्कच्या विकासाला चालना मिळेल. औद्योगिक वसाहतीतील उद्योगांमुळे भूखंड शिल्लक नसल्यामुळे अतिरिक्त वसाहतीसाठी जमीन अधिग्रहण करावी लागली. मोठी प्रवासी आणि मालवाहू विमान वाहतुकीमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

समृद्धी महामार्गामुळे राज्यातील आर्थिक विकासात भर पडणार आहे. शेतकऱ्यांचा उत्पादित माल मोठ्या बाजारपेठेत कमी वेळेत पोहोचविणे सोईचे होईल. बळीराजा अभियानातून राज्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. यामुळे येत्या दोन वर्षांत राज्याची सिंचन क्षमता पूर्णत्वास जाणार आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम गुणवत्तापूर्ण आणि विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावेत. बेलोरा विमानतळ हे मॉडेल विमानतळ म्हणून नावलौकीक होण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने उत्कृष्ट काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले.

पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी विमातनळाच्या विकासामुळे उद्योजकांची सोय होणार आहे. त्यामुळे या भागात नवीन उद्योग येण्यास मदत होईल. तसेच रात्री विमाने उतरविण्याची सुविधा करावी, अशी मागणी केली.

सुरवातीला मुख्यमंत्र्यांनी कुदळ मारून भूमिपुजन केले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमापूर्वी बेलोरा विमानतळावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आगमन झाले. पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.