Published On : Fri, Jun 15th, 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वॉशिंग्टनमध्ये पुरस्कार प्रदान

Advertisement

मुंबई: राज्यात नव्या विकासपर्वाची सुरुवात करणाऱ्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा आज सातासमुद्रापार अनोखा आणि अभिमानास्पद असा गौरव झाला. अमेरिकेतील जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटी, इंडिया इनिशिटिव्ह आणि सेंटर फॉर इंटरनॅशनल स्टडिज यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज वॉशिंग्टन येथे ‘आऊटस्टॅंंडिंग लिडरशिप इन डेव्हलपमेंट’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जागतिक बँकेने राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आर्थिक सहकार्याची तयारी दर्शविली असून फोर्ड मोबिलिटी कंपनीकडून एकीकृत वाहतूक व्यवस्थेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणीसाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे.

अमेरिकेच्या राजधानीत आज झालेल्या पुरस्कार वितरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी सत्काराला उत्तर देताना राज्यातील परिवर्तन पर्वाची यशोगाथा विशद केली. आपण हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही राज्याची सुत्रे हाती घेतली तेव्हा राज्याला मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागत होता. शाश्वत शेतीसाठी जलसंवर्धन हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे लक्षात घेऊन राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली. दुष्काळ आणि टँकरमुक्त होण्यासह या गावांमधील अर्थकारण सुद्धा वेगाने बदलत आहे. लोकसहभाग हे या अभियानाचे सर्वात मोठे यश असून त्यामुळे जलयुक्त शिवार ही आता लोकचळवळ बनली आहे. नागरिकांनी केवळ श्रमदान आणि निधी संकलन केले नाही तर पाण्याचे विज्ञान समजून घेतले, हे महत्त्वाचे आहे.

निवडणुकीपूर्वी आम्ही जाहीर केलेल्या ‘व्हीजन डॉक्युमेंट’मधील बहुतांश बाबींची पूर्तता झाली आहे आणि उर्वरित बाबी अंमलबजावणीच्या टप्प्यात असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शेती आणि ग्रामीण अर्थकारणाला नवीन दिशा देण्यासाठी आम्ही विविध अभियाने राबवित आहोत. भविष्यात डिजिटल अर्थव्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने गावांना मोठ्या प्रमाणात रस्त्यांची जोडणी देतानाच डिजिटल कनेक्टिव्हीटी देखील देण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील 24 जिल्ह्यांमधील लॉजिस्टिक आणि कृषीप्रक्रिया उद्योगांना चालना मिळणार आहे. राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या वॉररूमसारख्या संकल्पनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.

फोर्ड मोबिलिटीतर्फे राज्यात सेंटर ऑफ एक्सलन्स

फोर्ड मोबिलिटीच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि अध्यक्षा मर्सी क्लेव्होर्न तसेच मोबिलिटी मार्केटिंग अँड ग्रोथचे उपाध्यक्ष ब्रेट व्हेटली यांचीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. राज्यातील एकीकृत वाहतूक व्यवस्थेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणीसाठी 50 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 341 कोटी रूपये) इतक्या गुंतवणुकीचा प्रस्ताव या समुहाने दिला आहे. राज्यात स्मार्ट मोबिलिटी प्लान तयार करण्याच्या दृष्टीने हे सेंटर उपयुक्त ठरणार आहे. यापूर्वी एमएमआरडीए आणि फोर्ड यांच्यात 24 नोव्हेंबर 2017 रोजी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यानुसार फोर्डने आपल्या निधीतून बसेस, रेल्वे, मेट्रो, ऑटो, टॅक्सी या सर्व वाहतूक साधनांचा समावेश असलेल्या प्रवाशांसाठीच्या सामायिक आराखड्याचा प्राथमिक अभ्यास केला आहे.

त्याचप्रमाणे जॉन्सन कंट्रोल्सच्या ग्लोबल सस्टेनेबिलिटी अँड इंडस्ट्री इनिशिएटिव्हचे उपाध्यक्ष क्ले नेस्लर यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. भारतात इंटिलिजन्ट ट्राफिक कंट्रोल सिस्टीम्ससाठी गुंतवणूक करण्याची तयारी त्यांनी या भेटीदरम्यान दर्शविली.

मल्टिमॉडल कॉरिडॉरला जागतिक बँकेचे सहकार्य

मुंबई महानगर क्षेत्रात मल्टिमॉडल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर निर्माण करण्यासह राज्यातील ग्रामीण उपजीविका प्रकल्प, सौरऊर्जा ग्रीड, दुष्काळ निवारण यासारख्या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जागतिक बँक सहकार्य करणार आहे. जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टलिना जॉर्जिव्हा आणि मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या आज वॉशिंग्टन येथे झालेल्या भेटीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.

या भेटीत मुंबईतील विविध प्रकल्पांसह राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आर्थिक सहकार्य करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. मुंबई महानगर क्षेत्रात मल्टिमॉडल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आणि राज्यातील सुमारे 10 हजार गावांतील ग्रामीण उपजीविका प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यास जागतिक बँकेकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. त्याचप्रमाणे सौरऊर्जा ग्रीड, दुष्काळ निवारण आदींसाठीही मदत करण्यात येणार आहे. नागरिकांची संमती घेऊन भूमीअधिग्रहण करण्याच्या महाराष्ट्राच्या मॉडेलची श्रीमती जॉर्जिव्हा यांनी यावेळी प्रशंसा केली.

अमेरिकन काँग्रेस सदस्य जॉर्ज होल्डिंग आणि तुलसी गॅबर्ड यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांची आज भेट झाली. अमेरिका आणि भारताचे मैत्री-संबंध अधिक दृढ करण्यासाठी कार्य करणाऱ्या अमेरिकन काँग्रेसच्या इंडिया कॉकसचे ते प्रमुख आहेत. इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये केलेली उल्लेखनीय प्रगती आणि इतर सुधारणांबद्दल या दोन्ही नेत्यांनी राज्याची प्रशंसा केली. अमेरिका आणि तेथील गुंतवणूकदारांकडून मिळत असलेल्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी आभार मानले.

बिझनेस फोरममध्ये मुख्यमंत्र्यांचा संवाद

यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमतर्फे (यूएसआयएसपीएफ) आयोजित बिझनेस फोरमला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची गगनभरारी आणि पायाभूत सुविधांवर आधारित विकासाचे मॉडेल या विषयांवर प्रकाश टाकला. मुंबई झपाट्याने फिनटेक राजधानी म्हणून पुढे येते असून राज्याने नुकतेच फिनटेक धोरण जाहीर केले आहे. इंडस्ट्री 4.0 च्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्राने पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे. युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणावर सर्वाधिक भर देण्यात येत असून अभियांत्रिकी महाविद्यालये आणि आयटीआय यांनी उद्योगांना सोबत घेऊन आवश्यकतेप्रमाणे कौशल्य प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

बिझनेस फोरमसाठी अमेरिकेतील आघाडीच्या अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेज सारना, यूएसआयएसपीएफचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश आघी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी यावेळी उपस्थित होते.