Published On : Thu, Jan 2nd, 2020

पोलिसांना सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध – ठाकरे

Advertisement

पोलीस वर्धापन दिन समारंभात प्रथमच संचलनासह मुख्यमंत्र्यांना मानवंदना

मुंबई : “आपल्या हिमतीने शिवरायांच्या महाराष्ट्राची मान जगात उंचवा. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाला आवश्यक अशा जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या समारंभात पोलीस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच ध्वजप्रदान दिनानिमित्त असे संचलन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पहिल्याच संचलनात मानवंदना स्विकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी हा क्षण आयुष्यातील अनमोल ठेवा बनल्याचे नमूद केले.

या संचलनात राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पोलीस वाद्यवृंद पथकांनी संस्मरणीय अशा धून सादर करून रंग भरला. तर विशेष सुरक्षा विभागाने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेशी निगडित प्रात्यक्षिकांनी थरार निर्माण केला.

संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह पोलीस दलातील वरीष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सुरुवातीलाच उपस्थितांना आणि विशेषतः पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, वर्ष संपताना नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील दीक्षांत समारंभास तर नवीन वर्ष सुरू होताना या देखण्या आणि शिस्तबद्ध संचलनाचे साक्षीदार होता आले, हा आनंददायी योगायोग आहे. महाराष्ट्र पोलीस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे. पोलीसांसाठी या “अभय मुद्रा” वरील ब्रीदवाक्याप्रमाणे कर्तव्य बजावण्याची कठीण जबाबदारी असते. त्यामध्ये ताण-तणाव स्वीकारून, इतरांना निर्धास्त करावे लागते. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले. त्यासाठी पोलीसांना “मानाचा मुजरा” या शब्दांत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कौतुकोद्गार काढले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानंही मोठी आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागले आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सुविधाच्या रुपाने पाठबळ दिले जाईल. त्यातून त्यांनी हिम्मत कमवावी अशी अपेक्षा आहे. या हिमतीमुळेच शिवरायांच्या महाराष्ट्राची मान आणखी उंचावता येईल. त्यामुळे पोलिस दलाला पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.

सुरुवातीला राज्य राखीव पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, मुंबई पोलीस यांच्यासह विविध पथकांनी बंदुकीच्या हवेत फैरी झाडून सलामी दिली. त्यानंतर शानदार संचलनासह मानवंदना दिली. परेड कमांडर पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वात संचलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक संजय कल्याणी यांच्या नेतृत्वात पोलीस वाद्यवृंद पथकांनी सुश्राव्य धून सादर केल्या.

संचलन समारंभात प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तुषार दोशी यांनी आभार मानले.

मुख्यमंत्र्यांनी उलगडला ऋणानुबंध पट
महाराष्ट्र पोलीस दलाला २ जानेवारी १९६१ ला तत्कालिन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत ध्वज प्रदान केला. हा ध्वज जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे प्राचार्य व्हि. एन. आडारकर यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. प्राचार्य आडारकर हे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर मध्येच राहतात. तसेच स्वतः मुख्यमंत्री ठाकरे हे जे.जे. स्कूल ऑफ आर्टसचे विद्यार्थी. त्यामुळे ध्वज प्रदानाच्या निमित्ताने आयोजित आणि त्यातही पहिल्यांदाच संचलनासह होणाऱ्या या समारंभास उपस्थित राहता आले. असाही पोलिसांशी ऋणानुबंध जोडल्याचा पट मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी भाषणात उलगडला.

पोलिसांच्या निवासस्थान संकुलाचे भूमीपूजन संपन्न
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मरोळ येथील निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रिडासंकुल यांच्यासह सर्व सुविधायुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी तळमजल्यासह सात मजल्यांच्या सोळा इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) बिपिन बिहारी यांनी स्वागत केले व प्रकल्पाची माहिती दिली.

फोर्स वनच्या प्रशिक्षण केंद्राचे मुख्यमंत्र्यांकडून कौतूक
फोर्स वन या विशेष पोलिस दलाच्या जोगेश्वरी येथील प्रशिक्षण केंद्रास मुख्यमंत्री श्री. ठाकरे , मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. याप्रसंगी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक सुखविंदर सिंह उपस्थित होते. या केंद्राने नुकताच पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. यासह नेमबाजी आणि प्रशिक्षणातील काठीण्यपातळीतील प्राविण्यासाठीची पदके पटकाविली आहेत. याबाबींचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विशेष कौतुक केले.

महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज
महाराष्ट्र पोलीस दल दरवर्षी २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करते. महाराष्ट्र पोलीस दलास या दिवशी भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला होता. ज्यामुळे महाराष्ट्र पोलीसांना विशेष दर्जा मिळाला. या ध्वजावर पोलीस दलाचे ‘अभय मुद्रा’ हे बोधचिन्ह म्हणजे उजव्या हाताचा पंजा चित्रांकीत आहे. त्यामध्येच “वाईटाचा नाश आणि चांगल्याचे रक्षण” या अर्थाचे जनतेला संरक्षणाची ग्वाही देणारे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे संस्कृतमधील पोलीसांचे ब्रीद समाविष्ट आहे.