मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावरील निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही भेट स्नेहभोजनाच्या निमित्ताने झाली असली, तरी राजकीय संकेत स्पष्ट दिसून येत आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठी संभाव्य युतीबाबत प्राथमिक चर्चा झाली.
दरम्यान, ही पहिलीच वेळ नाही की शिंदे-राज ठाकरे भेटले, पण यावेळची भेट विशेष मानली जात आहे. कारण विधानसभा निवडणुकीदरम्यान माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटाचे सदा सरवणकर रिंगणात उतरले होते. त्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
गेल्या काही महिन्यांतील महत्त्वाचे संदर्भ:
-राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर सातत्याने टीका केली होती.
-गंगेबाबतच्या वक्तव्यावरून मनसे आणि शिंदे गटामध्ये टोकाची प्रतिक्रिया
-‘लाडकी बहीण’ योजनेवर राज ठाकरेंनी उघडपणे टीका केली होती.
-विधानसभा निवडणुकीत सरवणकरांच्या उमेदवारीमुळे संबंध ताणले गेले होते.
या पार्श्वभूमीवर आता ही भेट म्हणजे राजकीय संबंधांमध्ये सौहार्द निर्माण करण्याचा प्रयत्न मानला जात आहे. शिवाय, मनसेने जरी ‘स्वबळा’चा नारा दिला असला तरी फडणवीसांना अटीशर्थी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे युतीसाठी दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नाहीत.
एकनाथ शिंदेंनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आपल्या कामांच्या फाईल्स अडवल्याबाबत तक्रार केल्याची चर्चा आहे. त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्व न दिल्यामुळे महायुतीत अंतर्गत नाराजी असल्याचं संकेत मिळत आहेत.
यामुळे शिंदे-राज ठाकरे यांची ही भेट म्हणजे केवळ स्नेहभेट नसून, आगामी राजकीय भूकंपाची नांदी ठरू शकते.