Published On : Tue, Apr 30th, 2024

नागपुरात महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!

Advertisement

नागपूर : १ मे रोजी महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी लोक पारंपरिक महाराष्ट्रीय पोशाख परिधान करतात आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचा गौरव करतात. कारण- याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. साधारण ६४ वर्षांपूर्वी १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्रासह गुजरात राज्याची स्थापनादेखील १ मे रोजी करण्यात आली होती.

यंदा महाराष्ट्र राज्याचा ६५वा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालय स्थळी सकाळी ८.०० वाजता पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. नागपुरचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क येथे होणार आहे.

तर दुसरीकडे भंडारा येथील पोलीस कवायत मैदानावर आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते तर गोंदिया येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र ही थोर महात्म्यांची भूमी आहे. याठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत, महात्मा फुलेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक थोर मंडळींचा जन्म झाला.