रायगड : खालापूरच्या इर्शाळवाडीतल्या ठाकूरवाडी या गावावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये जवळपास २५ ते ३० घरं ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान या घटनेनंतर आतापर्यंत केलेल्या बचावकार्याची माहिती दिली.
रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी ही वाडी आहे. येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे मानवली गावातून पायी चालत जावं लागतं. वाडीत ४८ कुटुंबं वास्तव्यास असून तिथली लोकसंख्या २२८ इतकी आहे. इथे गेल्या तीन दिवसांत ४९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, असे फडणवीस सभागृहात म्हणाले.
इर्शाळवाडी ही खूप छोटी वाडी आहे.ठाकर या आदिवासी लोकांची इथे प्रामुख्याने वस्ती आहे. हे ठिकाण संभाव्य दरडप्रवण ठिकाणांच्या यादीत समाविष्ट नाही. यापूर्वी या ठिकाणी अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे फडणवीस म्हणाले.
या घटनेचे गांभीर्य पाहता सर्व प्रशाकीय यंत्रणा घटनास्थळी आहे. जेसीबीसारखी यंत्रणा वर नेता येत नसल्यामुळे अकुशल मजुरांच्या साहाय्याने बचावकार्याचे प्रयत्न चालू आहेत.
एनडीआरएफचे १५० तर ५०० अकुशल मजूर घटनास्थळी बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहेत. माती, दगडांचा ढिगारा, तीव्र उतार, चिखल आणि मुसळधार पाऊस यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. एनडीआरएफच्या देखरेखीखाली स्थानिक ट्रेकर्स, जवान आणि सिडकोने पाठवलेले मजूर यांच्यामार्फत बचावकार्य सुरू आहे. तसेच स्नायफर डॉग स्क्वाड घटनास्थळी पोहोचल्याची माहितीही फडणवीस यांनी सभागृहात केली.