Published On : Wed, Jul 14th, 2021

डेंग्यू वाढतोय काळजी घ्या- आर. विमला

Advertisement

कोरडा दिवस पाळा, विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा – 15 ते 30 जुलै

नागपूर : डेंग्यूचा आजार जिल्ह्यात वाढत असल्याने नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा तसेच घरात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आर विमला यांनी केले आहे.

अनियमित पावसामुळे साथीचे आजार सुध्दा वाढत आहे. यामध्ये लहान मुलांची काळजी घ्यावी व घरात असलेले कुलर्स तात्काळ काढावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाड्यानिमित्ताने राबवायच्या विविध योजना संदर्भात जिल्हा टास्क फोर्सची बैठक आज आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. दावल साळवे, अमित टंडन, डॉ. शैलजा गायकवाड, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी सुरेखा चौबे उपस्थित होते.

पंधरवाडा राबवितांना कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचा अवलंब करावा. याकामासाठी आशा कार्यकर्तींना प्रत्येकी शंभर रुपये मानधन देण्यात येणार असून आशा सेविकांनी घरोघरी जावून माहिती संकलित करावी, असे त्यांनी सांगितले.

घरातील साचलेले पाणी काढून टाकावे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. तसेच स्वच्छतेवर जास्त भर देण्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर, हातांची स्वछता व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा. पालक आणि काळजी वाहकांमध्ये अतिसार तसेच कोविड प्रतिबंधक आणि व्यवस्थापन विषयक योग्य वर्तणूक बिंबवणे आवश्यक आहे. अतिसार असलेल्या बालकांमध्ये ओआरएस आणि झिंकच्या वापराबाबतचे प्रमाण जास्तीत जास्त होईल याची खबरदारी घ्यावी. सामाजिक व आरोग्य संस्था स्तरावर बालकांमधील अतिसाराच्या रुग्णांचे व्यवस्थापन काळजीपूर्वक होत असल्याबाबत खात्री करावी. जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतमार्फत गावात डासअळी नाशक फवारणी तसेच धुर फवारणी व सार्वजनिक स्वच्छता करावी. रुग्णाची माहिती घेवून तात्काळ उपाययोजना सुरु कराव्या. गटसभा, पोस्टर्स, पॉम्पलेट, बॅनर दंवडी, तसेच सोशल मिडियाद्वारे जनजागृती करण्याचे निर्देश श्रीमती आर. विमला यांनी दिले.

अनियमित पावसामुळे नागरिकांनी घरातील कुलर्स त्वरित काढावेत. कुलर्समधील पाणी काढण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सूचना कराव्या. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणास मदत होईल, असे त्या म्हणाल्या.

जिल्ह्यात वाढत असलेला डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी संबंधितांना दिल्या. विशेषत: शहरात व ग्रामीण भागात संशयित डेंग्यू रुग्ण आढळल्यास तात्काळ रुग्णाचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठवा. डबक्यात जमा झालेले पाणी फेकून द्यावे. या पाण्यात डास आढळल्यास किटकनाशक घालून तसेच पाणी फेकून डास उत्पत्ती नष्ट करावी, असे त्यांनी सांगितले.

पंधरवाडा राबविण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर, नर्स व आशांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तांबे यांनी सांगितले. यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या पंधरवाड्यात आशा सेविकांमार्फत बालकांची यादी तयार करण्यात येऊन अतिसाराच्या उपचारासाठी ओआरएस व झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार आहे. तसेच ओआरएसचे द्रावण तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. कॉर्नरमध्ये ओआरएस पाकिटे व झिंकच्या गोळया उपलब्ध करुन देण्यात येणार असून प्रत्येक तालुक्याचे संनियंत्रण व मुल्यमापन करण्यासाठी तालुकास्तरावर एक अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे श्री. तांबे यांनी सांगितले. या बैठकीस मनपा वैद्यकीय अधिकारी, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.