नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंग्यू, चिकनगुनिया या सारखे जीवघेणे आजार डोके वर काढत आहेत.यापार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज असून, नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस “कोरडा दिवस” म्हणून पाळावा असेही ते म्हणाले. नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य विभाग सज्ज झाले आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षणाला आरोग्य विभागाद्वारे सुरूवात करण्यात आली आहे. झोन निहाय आशा स्वयंसेविकाद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामध्ये आशा स्वयंसेविका घरोघरी भेट देऊन ताप रुग्णांची माहिती घेत आहे.
नागरिकांनी सर्वेक्षणादरम्यान योग्य ती माहिती देत सर्वेक्षण कार्याला सहकार्य करावे असे आवाहन देखील आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
नागरिकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक –
घरी आणि परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये यासाठी नागरिकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचा लारवा पाण्यात वाढत असल्यामुळे कुठेही पाणी जमा होऊ नये याची काळजी घ्यावी. कुलर, कुंड्या यातील पाणी दररोज बदलावे. याशिवाय ताप असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन देखील डॉ. चौधरी यांनी यावेळी केले आहे.