Published On : Sat, Sep 22nd, 2018

नोटाबंदी, जीएसटी हा तुघलकी निर्णय : शत्रुघ्न सिन्हा

Advertisement

नागपूर : विद्यमान सरकारने नोटाबंदी व जीएसटीबाबत घेतलेले निर्णय हे मंत्रिमंडळाचे किंवा भाजपाचे नाहीत. तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना विश्वासात न घेता घेतले आहेत. हे निर्णय काळे धन आड मार्गाने पांढरे करण्याचा तुघलकी निर्णय आहे, असा गंभीर आरोप भाजपचे नेते खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी केला.

काटोल येथे काटोल फेस्टीवहलचे आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत आयोजित ‘युवा संसद’मध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमं आदमी पार्टीचे नेते खा. संजय सिंग, प्रवक्ता कीर्ती शर्मा मेमन, आ. डॉ. आशिष देशमुख, विनोद सहाय, अभिजित गुप्ता, प्रा. जवाहर चरडे, दिनकर राऊत, युवराज चालखोर, मारोतराव बोरकर, विजय महाजन, सोपान हजारे उपस्थित होते.

खा. संजयसिंग यांनीही सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करीत सरकार देशातील बंधुभाव संपविण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. छोटी राज्ये विकासाच्या दृष्टीने सोयीची असल्याचे सांगून त्यांनी विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थन केले.

आशीष देशमुख यांनी रामदेवबाबांनी काटोल येथे उद्योग उभारण्याचे आश्वासन देऊन साधे शेडही उभारले नाही, असा आरोप केला. मात्र, पक्षाचे सदस्यत्व अथवा आमदार पदाच्या राजीनाम्याबाबत ते काहीही बोलले नाही. प्रास्ताविक विद्याराज कोरे यांनी केले तर संचालन प्राचार्य डॉ. विजय धोटे यांनी केले. उत्कर्ष पवार यांनी आभार मानले.

राजीनामा न देण्याचा सल्ला
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, माझ्याबाबत विविध कंड्या पिकविल्या जात आहे. पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचा आरोप केला जात आहे. मी सर्वाधिक मताधिक्क्याने विजय संपादन केला असला तरी मला उमेदवारी न देण्याची धमकी दिली जात आहे. या सरकारने खरे बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावून गेतले आहे. पक्ष अथवा आमदार पदाचा राजीनामा देऊ नका, पक्षाने बडतर्फ केले तर करू द्या. पण, जनतेची कामे करणे सोडू नका असा सल्लाही सिन्हा यांनी देशमुखांना दिला.