Published On : Tue, Apr 18th, 2017

नोटाबंदीमुळे घसरलेल्या अर्थव्यवस्थेने शेतकरी उद्ध्वस्त: शिवसेना

Advertisement


मुंबई (Mumbai):
शेतकऱयांचे जीवन सध्या निसर्गाच्या अवकृपेने, कर्जाने व नोटाबंदीमुळे घसरलेल्या अर्थव्यवस्थेने उद्ध्वस्त झाले आहे. सरकारच्या घोषणांच्या पावसाने व जाहिरातबाजीने त्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला आहे. एनडीएच्या बैठकीच्या पार्श्वभूमिवर टीकेचा काहीसा मवाळ झालेला सूर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शिवसेनेने पून्हा एकदा जहाल केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या दै. सामनात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना धारेवर धरले आहे.

पंतप्रधान मोदी हे ‘मन की बात’मधून देशातील जनतेशी संवाद साधीत असतात. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या दूरदर्शन कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी जी अश्वासने दिली त्याचा धुरळा गेल्या पाच-पंचवीस वर्षांत हजारदा उडला असल्याचा चिमटा ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना काढला आहे. तसेच, हा धुरळा उडत असताना तेव्हा विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस हे शेतकऱयांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी करीत होते. याचा त्यांना आता विसर पडला आहे, असे सांगतानच शिवसेना आणि भाजप या दोघांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी विरोधी पक्षात असताना आक्रमक पद्धतीने केली होती. शिवसेना आजही त्या मागणीवर ठाम आणि आग्रही असल्याचे सामनाच्या माध्यमातून ठाकरे यांनी पून्हा एकदा ठासून सांगितले आहे.

दरम्यान, जालन्यातील रामजी व रत्नमाला यांनी अखेर मृत्यूला कवटाळले. असे अनेक रामजी व रत्नमाला आपल्या मुलांना निराधार करून रोज मरण जवळ करीत आहेत. सरकार अशा प्रकरणांची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून पुन्हा दूरदर्शनवर गप्पा मारण्यासाठी पोहोचते. हे असेच आणखी काही काळ सुरू राहिले तर एक दिवस सरकारच्या मृत्यूचीही आकस्मिक अशी नोंद करावी लागेल. लाखो शेतकऱ्यांचे शाप उत्पात घडविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी सामनातून दिला आहे. तसेच, कधीकाळी सध्याचे मुख्यमंत्री आक्रमक भाषेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करीत होते. विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री होतो तेव्हा रंग बदलतो, या टीकेतून आणि समजातून फडणवीस यांनी स्वतःला बाहेर काढले पाहिजे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement