नागपूर : शहरातील बहुप्रतिक्षित टेकडी उड्डाणपूल पाडण्याचे कार्य महा मेट्रो 19 जुलै 2023 (बुधवार) पासून हाती घेणार आहे. उड्डाणपुलाखालील दुकाने रिकामी करून स्थलांतरित करण्यात आली असून नागपूर महानगरपालिकेने बांधकाम पाडण्यास महा मेट्रोला परवानगी दिली आहे.
उड्डाणपूल पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असून विशिष्ट ठिकाणी डायव्हर्शन बोर्ड आणि बॅरिकेड्स महा मेट्रोच्या वतीने लावण्यात आले आहेत. नागपूर पोलिस, वाहतूक विभागाने वाहनांची वाहतूक वळवण्यासाठी आवश्यक परवानगी दिली आहे. उड्डाणपूल पाडण्याच्या कार्यादरम्यान या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील.
812-मीटर-लांब आणि 10.5 मीटर रुंद टेकडी उड्डाणपूल 2008 मध्ये 16.23 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता. उड्डाणपुलाखाली एकूण १७५ दुकाने बांधण्यात आली होती, परंतु जयस्तंभ चौक परिसरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता व वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जयस्तंभ चौकाच्या आजूबाजूच्या रस्त्याच्या परिसरात योग्य ते बदल करण्याचे प्रस्तावित करत योजना आखण्यात आली ज्यामध्ये किंग्जवे येथे वाय शेप उड्डाणपूल आणि सध्याच्या लोहा पुलाजवळ रेल्वे-अंडर-ब्रिज (RuB) प्रस्तावित करण्यात आला. या दोघांसह उड्डाणपूल पाडून या ठिकाणी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल टेक्नॉलॉजी (VNIT) द्वारे संपूर्ण प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली.
सदर विकास कार्याचा अहवाल 2018 मध्ये सादर करण्यात आला आणि त्यानंतर संपूर्ण काम महा मेट्रो मेट्रोला डिपॉझिट वर्क तत्त्वावर देण्यात आले. त्यानुसार किंग्जवे फ्लायओव्हर आणि आरयूबी बांधण्यात आले व 1 एप्रिल २०२३ रोजी उद्घाटन करण्यात आले. व्हीएनआयटीच्या अहवालानुसार, जयस्तंभ आणि मानस चौकला जोडणारा रेल्वे स्थानकासमोरील सध्याचा उड्डाणपूल एट-ग्रेड सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यासाठी पाडणे आवश्यक आहे.
उड्डाणपूलखाली काम करणाऱ्या दुकानदारांना सामावून घेण्यासाठी महा मेट्रोने 111 दुकाने बांधली आणि ती त्यांना वाटपासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आली. दुकानदारांनी कायदेशीर हस्तक्षेपाची मागणी केली होती ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यास विलंब झाला मात्र, उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या दुकानदारांनी आता आपले कामकाज वळवल्या नंतर महापालिकेने उड्डाणपूल पाडण्याची तयारी दर्शवली आहे.
मेट्रोचे प्रकल्प (संचालक) श्री राजीव त्यागी यांनी सांगितले कि, एनसीसी ( NCC) द्वारे मेसर्स मॅटच्या माध्यमातून उड्डाणपूल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. उल्लेखनीय आहे कि मेसर्स मॅट या एजंसीने वर्धा रोडवरील छत्रपती चौक येथील उड्डाणपूल पाडला होता. “टेकडी उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण होणार असून हवामानाच्या परिस्थितीनुसार यामध्ये विलंब होऊ शकतो. उड्डाणपूल पाडण्याचे कार्य फुटपाथ ब्रेकर प्रक्रियेद्वारे केल्या जाणार असल्याचे श्री. त्यागी यांनी सांगितले.
ट्रॅफिक प्लॅन पुढील प्रमाणे :-
• सेंट्रल एव्हेन्यूकडून एलआयसी किंवा आरबीआय चौककडे जाणारी वाहतूक आणि त्याउलट, वाहतूक पूर्वी प्रमाणे कार्यरत असेल.
• एलआयसी किंवा आरबीआय चौककडून सेंट्रल एव्हेन्यू किंवा रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहतूकी मध्ये देखील कुठलाही बदल करण्यात आला नाही.
• सेंट्रल एव्हेन्यू येथुन प्रवास करणार्यां ना आणि रेल्वे स्थानकाकडे जायचे आहे त्यांना पूर्वीप्रमाणेच डावीकडे वळण घेऊन त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचावे लागेल.
• उड्डाणपुलावरून जयस्तंभ चौक आणि मानस चौक कडे जाण्यास बंदी असेल.