वाकेश्वरमधील महिलेला विवस्त्र करण्याचा प्रकार प्रकरणाची सखोल चौकशी दोषींवर कारवाईची मागणी

बावनकुळेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना भेटले

नागपूर: जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर या गावातील महिलेला विवस्त्र करण्याच्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण जिल्हाभर उमटत असतानाच या प्रक़रणाची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातर्फे करण्यात आली आहे. माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ आज जिल्हाधिकार्‍यांना भेटले व आपले निवेदन त्यांना दिले.

या महिलेची धिंड काढण्यात आली असल्याचे निवेदनात म्हटले असून अवैध सावकाराने हा प्रकार केला असल्याचे उघड झाले आहे. अवैध सावकाराने आपल्या पत्नीच्या मार्फत हा प्रकार करविल्याचे कळते. सत्ताधारी पक्षातील राजकीय कार्यकर्ते या प्रकरणात गुंतले असण्याची शक्यता लक्षात घेता दोषींवर तातडीने कठोर ककारवाईची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनाही निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी बावनकुळे यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आ. सागर मेघे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, डॉ. राजीव पोतदार, माजी आ. सुधीर पारवे, आ. सावरकर, माजी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आ. अशोक मानकर, किशोर रेवतकर, निल निधान, चरणसिंग ठाकर, रमेश मानकर, अशोक धोटे आदी उपस्थित होते.