Published On : Mon, Aug 6th, 2018

दिल्ली-मुंबई हरित महामार्गाचे भूमी अधिग्रहण डिसेंबरपर्यंत – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Advertisement

नवी दिल्ली: भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने सुरु केलेल्या ‘भूमी राशी’ पोर्टलमुळे दिल्ली-मुंबई हरित महामार्गाच्या भूमी अधिग्रहणाच्या कामाला गती येईल व यावर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

परिवहन भवन येथे आज श्री. गडकरी यांच्या हस्ते ‘भूमी राशी’ आणि ‘पीएफएमएस लिंकेज’ या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय व राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोर्टलचे उद्घाटन झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. गडकरी बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया, सचिव युधवीरसिंह मलिक यावेळी मंचावर उपस्थित होते.

सध्याच्या दिल्ली-मुंबई महामार्गाच्या भूमी अधिग्रहणाप्रमाणे प्रस्तावित हरित महामार्गासाठी प्रती हेक्टरसाठी साडेसात कोटी रूपये खर्च येणार होता. मात्र, या मार्गासाठी नव्याने योजना आखण्यात आली व त्यानुसार दिल्लीहून गुडगाव, जयपूर, अलवर, रतलाम, झाबुआ, मुंबई या मार्गे मागास भागातून हा महामार्ग जाणार आहे.

या संपूर्ण मार्गावर भूमी अधिग्रहणासाठी १६ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून केंद्र शासनास १६ ते २० हजार कोटींची बचत होणार आहे. या महामार्गासाठी एकूण १ लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या ४४ हजार कोटींच्या कामांना सुरुवात झाली आहे. भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्यावतीने आज सुरु करण्यात आलेल्या पोर्टलमुळे भूमी अधिग्रहणाच्या कामाला गती येईल व हे काम डिसेंबर २०१८ पूर्वीच होईल असे ते म्हणाले .

दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतील मागास भागातून हा महामार्ग जाणार असल्याने या भागात उद्योग निर्मिती, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल. तसेच, या भागातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सुटतील असा विश्वास श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.