Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Apr 2nd, 2021

  दिल्ली-मेरठ द्रुतगती महामार्ग जनतेला वाहतुकीसाठी खुला

  – 8346 कोटी खर्च, प्रदूषणावर नियंत्रण,जनतेसाठी अनेक सुविधा मार्गावर उपलब्ध


  नागपूर– दिल्ली-मेरठ द्रुतगती महामार्गाचे दुसर्‍या आणि चवथ्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यामुळे हा महामार्ग आज जनतेला वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे आता दिल्ली निघालेला प्रवासी 45 मिनिटात मेरठ येथे पोचणार आहे. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी अत्यंत गतीने हा महामार्ग पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

  वाहतूक अत्यंत सुलभ आणि गंतव्य स्थानावर लवकर पोचण्याच्या दृष्टीने राजधानी दिल्लीच्या क्षेत्रात 8346 कोटी रुपये खर्च करून हा मार्गांचे काम पूर्ण करण्यात आले. बांधकामाच्या पहिल्या टप्प्यात रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करून 27 मे 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. तसेच दुसर्‍या टप्प्यातील रुंदीकरणाचे काम 30 सप्टेंबर 2019 रोजी पूर्ण करून केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

  एकूण 82 किमीचा हा महामार्ग असून अंतर्गत महामार्ग 60 किमी तर राष्ट्रीय महामार्ग 22 किमीचा आहे. या महामार्गावर एक उड्डाणपूल असून तांत्रिक कारणामुळे त्याचे रुंदीकरण करणे अजून शिल्लक आहे. या वर्षाअखेरपर्यंत रुंदीकरणाचे काम पूर्ण होईल. या महामार्गावर एकूण 24 लहान-मोठे पूल, 10 उड्डाणपूल, 3 रेल्वेचे पूल, 95 अंडरपास, 15 भूमिगत पादचारी रस्ते, 12 अन्य पादचारी रस्त्यांचा समावेश आहे. या महामार्गावर दिव्यांच्या प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. 4500 पथदिवे लावण्यात आले असून सुरक्षेच्या दृष्टीने पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम उल्लंघन करणार्‍यावर नियंत्रण येऊन जनतेसाठी प्रवास सुखकर होईल.

  प्रथम आणि द्वितीय टप्प्याच्या रस्त्याच्या कामात सायकल आणि पादचारींसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. सायकल चालकांसाठी 2.5 मीटर आणि पादचार्‍यांसाठी 2 मीटरचा फुटपाथ बनविण्यात आला आहे. महामार्गावर हवामान, वाहतूक व महामार्गाशी संबंधित माहिती तसेच दुर्घटनेची माहिती प्रवास करणार्‍या नागरिकांना विविध ठिकाणी उपलब्ध होणार आहे. वाहतूक सोपी आणि सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर (एएनपीआर)चे तंत्र प्रथमच येथे वापरण्यात आले आहे. यामुळे न थांबता पथकर शुल्काचे संचालन होईल.

  याशिवाय इमर्जेन्सी कॉल बॉक्सची सुविधाही महामार्गावरील प्रवाशांना उपलब्ध राहील. तसेच अ‍ॅम्बुलन्स, क्रेन, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट, वाहन दुरुस्तीची सोयही प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या महामार्गामुळे वेळेची आणि इंधनाची बचतही होणार आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145