
नवी दिल्ली : लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान बिघडलेल्या प्रकृतीची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असल्याचे नमूद करत न्यायालयाने केंद्र सरकारला त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
सोनम वांगचुक गेल्या १९ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठाने सरकारी डॉक्टरांकडून दररोज वैद्यकीय तपासणी आणि सातत्याने आरोग्य निरीक्षण करण्याचे आदेश दिले.
सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले की, वांगचुक यांच्या आरोग्यावर नियमित लक्ष ठेवले जात असून सरकारी तसेच खासगी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जात आहे. वैद्यकीय अहवालही नियमितपणे उपलब्ध करून दिले जात आहेत.
यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, डॉक्टरांच्या अहवालात उपचारांची आवश्यकता दिसून आल्यास सरकारने कोणताही विलंब न करता आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
यावेळी केंद्र सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही वांगचुक यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीबाबत कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले. त्यांच्या या भूमिकेची न्यायालयाने नोंद घेत समाधान व्यक्त केले.
दरम्यान, सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली असून, न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे त्यांच्या आरोग्याच्या देखरेखीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.




