Published On : Wed, Oct 17th, 2018

सेवा हाच धर्म या भावनेतून जबाबदारीने काम करा

महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : दीक्षाभूमीवरील मनपाच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून दीक्षा भूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात यावी. संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेसह अनुयायांच्या आरोग्याबाबत काळजी घेताना सर्वांनी सेवा हाच धर्म या भावनेतून काम करावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे चोखामेळा अन्नाभाऊ साठे चौक दीक्षाभूमी परिसरात उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे बुधवारी (ता. १७) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.


याप्रसंगी विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, लक्ष्मी नगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, डॉ. संजय कांबळे, डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, विद्युत अभियंता संजय जायस्वाल, सहायक अग्निशमन अधिकारी केशव कोठे, आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, हत्तीरोग अधिकारी ‍जयश्री थोटे, लक्ष्मी नगर झोनचे झोनल आरोग्य अधिकारी रामभाऊ तिडके, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, राजेश हाथीबेड उपस्थित होते.

दीक्षा भूमी परिसरात सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात यावी. कोणतिही अनुसचित घटना घडू नये याची दक्षता घ्यावी. नागपूर महानगरपालिकेतर्फे तैनात स्वच्छता, अभियांत्रिकी, आरोग्य यासह विविध विभागांचे काम बौद्ध अनुयायांच्या सुविधेसाठी चोविस तास अविरत सुरू राहावे.

याशिवाय कामामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होणार नाही यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी ओळखून कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यावे, बौद्ध अनुयायांची कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन कर्तव्य भावनेतून कार्य करा. दूरदूरून दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायी येत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, शिवाय स्वच्छतेच्या दृष्टीने फिरते व स्थायी शौचालयांचीही व्यवस्था राखली जाईल, याची काळजी घेण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले. यानंतर अपर आयुक्त श्री. अझीझ्‍ शेख व राम जोशी यांनी संबंधीत विभागाकडून करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले तर आभार लक्ष्मी नगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने यांनी मानले.