नागपूर : नागपूर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, याच नागपुरात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असून, या निकालाकडे गांभीर्याने पाहण्याची आणि आत्मचिंतन करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर दिली.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने अतिशय चांगली कामगिरी केली असल्याचे घोसाळकर म्हणाले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतून निवडून आलेले आमदार सुशिक्षित असून, त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांची जाण आहे. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे आणि शिक्षण क्षेत्रातील समस्या मार्गी लागाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सरकारच्या कामकाजाबाबत जनतेमध्ये नाराजी असल्याचे या निकालातून दिसून येत आहे. शेतकरी त्यांच्या प्रश्नांमुळे चिंतेत आहेत, तर शिक्षकही आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
नागपुरात विकासकामे झाली असली, तरी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या पराभवाचा राजकीयदृष्ट्या विचार करण्याची गरज आहे. या निकालामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात बदल पाहायला मिळू शकतो, असेही घोसाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, दिल्लीतील इंडिया आघाडीच्या रॅलीला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी संबंधित पक्षांच्या भूमिकेचा उल्लेख केला. भविष्यातील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने हा सकारात्मक मार्ग ठरू शकतो आणि त्याचा इंडिया आघाडीलाही फायदा होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
रवींद्र धंगेकर यांच्याबाबत विचारले असता, प्रत्येकाची काम करण्याची स्वतंत्र पद्धत असते. संबंधितांनी एकत्र बसून विचार करायला हवा. आमची काम करण्याची पद्धत वेगळी असून, त्यांच्याशी आमचा काही संबंध असल्याचे मला वाटत नाही, असे घोसाळकर यांनी स्पष्ट केले.




