Published On : Thu, Sep 23rd, 2021

विद्यापीठ इमारत ते झिरो माईल फ्रिडम पार्क रोडचे लोकार्पण

Advertisement

मेट्रोने स्टेशनखालील बिटुमेन कारपेट कोट त्वरीत करण्याचे महापौरांचे निर्देश

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ इमारत ते जुने मॉरिस कॉलेज जवळील झिरो माईल फ्रिडम पार्कपर्यंतच्या रोडचे गुरूवारी (ता.२३) महापौर दयाशंकर तिवारी, कुलगुरू सुभाष चौधरी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते संयुक्तरित्या लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, प्र-कुलगुरू संजय दुधे, नासुप्रचे विश्वस्त संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, सत्तापक्ष उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पोहाणे, नगरसेवक निशांत गांधी, नगरसेविका रूपा राय, उज्ज्वला शर्मा, मनपाचे मुख्य अभियंता प्रदीप खवले, अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, उपअभियंता अनिल गेडाम, सिव्हिल इंजिनिअरींग असोसिएशनचे राहुल गायकी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ इमारत ते जुने मॉरिस कॉलेज जवळील झिरो माईल फ्रिडम पार्कपर्यंतचे रोड पूर्ण होउनही मेट्राच्या झिरो मॉईल स्टेशनखालील ‘बिटुमेन कारपेट कोट’(बी.सी. कोट) च्या कामामुळे लोकार्पण प्रलंबित राहिले होते. या मार्गामुळे नागरिकांना मोठी सुविधा निर्माण होउन मुख्य मार्गावरील वाहतूक भार कमी होणार आहे. मात्र मेट्रो स्टेशनखालील बी.सी.कोट च्या कामामुळे यामध्ये अडसर निर्माण होत होता. या मार्गामुळे नागरिकांना होणारी सुविधा लक्षात घेउन तातडीने या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. मेट्रोच्या झिरो माईल फ्रिडम पार्क स्टेशनखालील बी.सी. कोट त्वरीत करण्यासंबंधी मेट्रोला निर्देश देत असल्याचे यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ इमारत ते जुने मॉरिस कॉलेज जवळील झिरो माईल फ्रिडम पार्कपर्यंत १८ मीटर रुंदीच्या रोडची एकूण लांबी मेट्रो स्टेशनखालील ६४ मीटर रस्ता वगळून ६१५ मीटर एवढी आहे. मे. फोनिक्स इंजिनिअरींगतर्फे या रोडचे बांधकाम करण्यात आले आहे. रस्त्यासाठी ४६४.७१ लक्ष रुपये एवढा खर्च लागलेला आहे. या मार्गाच्या लोकार्पणामुळे नागपूर शहरातील नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झालेली आहे.