Published On : Tue, Oct 5th, 2021

महापौरांच्या हस्ते नैसर्गिक साधन संपत्तीच्या मॅपचे लोकार्पण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्मार्ट सिटीतर्फे आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमांची सांगता

नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेड आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत अंतिम दिवशी रविवारी (ता. ३) बिडीपेठ येथील त्रिकोणी उद्यानात ‘नैसर्गिक साधन संपत्ती’ मॅपचे लोकार्पण महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उद्यानातील वृक्षांची माहिती देणारे माहिती फलक प्रत्येक वृक्षांच्या दर्शनी भागात लावण्यात आले. सदर मॅप स्मार्ट सिटी आणि इकली दक्षिण एशिया यांच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे.

याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की, नागपूर स्मार्ट सिटीतर्फे वृक्षांसमोर शास्त्रोक्त माहिती सांगणारे फलक लावून नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. नैसर्गिक साधनांची माहीती देण्यासाठी नकाशे तयार करण्यात येत आहेत. भविष्यात नियोजन करताना या नकाशाचा मोठा लाभ होणार आहे, असेही ते म्हणाले. तसेच मानव भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गापासून दूर जात आहे. मात्र मानवाला निसर्गाच्या जवळ येण्याची गरज आहे, यासाठीच मनपातर्फे ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत पूर्व, दक्षिण आणि उत्तर नागपुरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंचावर महीला व बाल विकास समिती सभापती दिव्या धुरडे, नेहरू नगर झोन सभापती स्नेहल बिहारे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, नगरसेविका रीता मुले, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तुभ चटर्जी उपस्थित होते.

मान्यवरांनी दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी महापौरांच्या हस्ते आयडियाज कॉलेजचे प्रा. राहुल देशपांडे, प्रा. हर्षवर्धन नागपुरे, प्रियदर्शनी इंस्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन स्टुडिओचे प्रा. मृणाल गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच अडोस-पडोस स्पर्धेचे विजेते प्रथम आयनिश मडावी, द्वितीय तेजस्विनी पाटेकर आणि तृतीय विजेता वंश नेवारे यांचे सत्कारसुद्धा महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

यावेळी अकोला पी. एम. पी. हर्बल ऍग्रो सर्विसेसचे पंकज मांजरे यांनी आयुर्वेदिक वृक्षांची माहिती दिली. सोबतच इकलीचे शरद वेंगुरकर, आर्किटेक्ट स्मृती सवाने, मनपा सांस्कृतिक पथकाचे प्रमुख प्रकाश कलसिया, मंजूषा फुलंबरकर, अंजली कावळे, रंजना बांते, आशा मडावी, उमेश पवार, कमलाकर मानमोडे, राजू पवार व कुणाल दहेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

यावेळी पोलिस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी महिलांना भरोसा सेल व दामिनी पथकाबद्दल सविस्तर माहिती दिली. याशिवाय छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या चमूने आत्मसंरक्षण करण्याविषयी नागरिकांना विविध प्रकार प्रत्यक्ष करून दाखविले आणि मार्गदर्शन केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलचे संचालक तुषार सातव आणि सचिव दीपक आवळे आपल्या चमूसोबत उपस्थित होते. चाइल्ड हेल्प लाईन बद्दल माहिती श्रद्धा तालू यांनी दिली. त्यांच्या सोबत मीनाक्षी धडाडे, पूजा कांबले, कुलदीप माहुरकर होते.

कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, शुभांगी पोहरे, अंजली तिवारी यांनी केले. यावेळी स्मार्ट सिटीच्या कंपनी सचिव भानुप्रिया ठाकूर, मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, राजेश दुफारे, डॉ. प्रणिता उमरेडकर, मनजीत नेवारे, गुड्डी उजवणे, डॉ. शील घुले, राहुल पांडे, डॉ. पराग अरमल, अमित शिरपुरकर, अनूप लाहोटी, परिमल ईनामदार, आरती चौधरी, आरजूलता, विजया सावरकर, सोनाली गेडाम आदी उपस्थित होते.