Published On : Fri, Oct 13th, 2017

दिवाळीपूर्वी कर्जमाफीची घोषणा फोल, सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक!

Advertisement

मुंबई: 1 ऑक्‍टोबरपासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची सरकारची घोषणा फोल ठरली असून, दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासनही सरकार पाळू शकलेले नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधःकारमय करणाऱ्या या सरकारला आता शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

अहमदनगर जिल्‍ह्यातील सर्व तालुका काँग्रेस कमिटींचे नवनिर्वाचित अध्‍यक्ष, पदाधिकारी आणि शिर्डी विधानसभा मतदार संघातील नुकत्‍याच निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्‍यांच्या सत्‍कार समारोहात ते बोलत होते. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, जिल्‍हा काँग्रेस कमिटीचे अध्‍यक्ष जयंत ससाणे, शिर्डी लोकसभा युवक काँग्रेसचे अध्‍यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, पंचायत समितीच्‍या सभापती हिराबाई कातोरे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, सचिन गुजर, काशिनाथ लवाडे, राजेश परजणे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सत्कारमूर्तींचा गौरव केल्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना विखे पाटील यांनी राज्यातील अनेक प्रश्नांचा उहापोह केला. कर्जमाफीसंदर्भात सरकारची उदासीनता चव्हाट्यावर आणताना ते म्हणाले की, दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने आता घुमजाव केले आहे. बॅंकांकडून माहिती न आल्यामुळे दिवाळीपूर्वी कर्जमाफी शक्य नसल्याचे सहकार मंत्र्यांनी म्हटले आहे. राज्‍यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा दिमतीला असताना सरकार शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती जमा करू शकत नसेल तर हे सरकारचे राज्यावर नियंत्रण नसल्याचे प्रतिक आहे.

या सरकारचे केवळ घोषणाबाजी करून वेळ मारून नेण्‍याचे काम सुरु आहे. गोबेल्‍स नितीप्रमाणे केवळ मीडियात फोटो छापून स्‍वत:चीच पाठ थोपटून घेण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. सर्वसामान्‍य नागरिक आणि शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक करणाऱ्या या सरकारच्‍या विरोधात जनतेचा असंतोष तीव्र झाला असून, नांदेडचा महानगर पालिका निवडणुकीचा निकाल यासरकारला जनतेने हाणलेली सणसणीत चपराक आहे. राज्‍याला अंधारात लोटणाऱ्या सरकारला आता नागरिकांना दिवाळीच्‍या शुभेच्‍छा देण्‍याचा नैतिक अधिकारही राहिलेला नाही, असे विखे पाटील पुढे म्हणाले.

नांदेड महानगर पालिकेत काँग्रेस पक्षाला मिळालेले अ‍भूतपूर्व यश हे सरकारच्‍या विरोधातील असंतोषाचा उद्रेक असून, मतदारांनी सरकारला एकप्रकारे धडा शिकवला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालासंदर्भात सोशल मीडियावरून भारतीय जनता पक्षाने चुकीची आकडेवारी मांडली. पण या निवडणुकीत देखील काँग्रेस पक्षानेच सर्वाधिक जागा जिंकल्‍या, ही वस्तुस्थिती असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. ग्रामपंचायत निकालांची वस्‍तुस्थिती जाणून न घेता पंतप्रधानांनी राज्यातील भाजप नेत्यांचे अभिनंदन केले, ही बाब दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.

केवळ अस्मितांचे राजकारण करून लोकहितकारी कारभार होत नाही. निवडणूक प्रचारात शेतीला 12 तास सलग वीज देण्‍याची घोषणा करणाऱ्या सरकारने राज्‍याला अंधारात ढकलले आहे. सरकारच्या करणी अन् कथनीत मोठा फरक असल्‍याचे आहे. फवारणीतून विषबाधा झाल्याने यवतमाळमध्‍ये 19 शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतरही कृषिमंत्री तिथे तातडीने पोहचू शकले नाही. या सरकारने शेतकऱ्यांचा जीव स्‍वस्‍त करून ठेवला आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली व अनेकांचा हकनाक जीव गेल्यानंतर सरकारला जाग आली, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

नवनिर्वाचित काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी संघटितपणे काम करून लोकांमध्‍ये विश्‍वास निर्माण करावा. लोकसभा आणि विधानसभा एकत्रित घेण्‍याचा विचार सुरू झाला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे. थेट जनतेतून निवडून आल्‍यामुळे सरपंच पदाचे महत्‍व अधिकच वाढले आहे. जनतेमध्ये आपण केलेली निवड योग्य असल्याची भावना निर्माण होईल, अशा पध्‍दतीने काम करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement